असा असणार राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम, पंतप्रधानही जाण्याची शक्यता

अयोध्येतल्या राम मंदिराच्या भूमिपूजनाचा मुहूर्त अखेर ठरला आहे.

Updated: Jul 19, 2020, 01:24 PM IST
असा असणार राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम, पंतप्रधानही जाण्याची शक्यता title=

अयोध्या : अयोध्येतल्या राम मंदिराच्या भूमिपूजनाचा मुहूर्त अखेर ठरला आहे. ५ ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीमध्ये राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधान ५ ऑगस्टला सकाळी ११ वाजता अयोध्येमध्ये पोहोचतील. भूमिपूजनाचा हा कार्यक्रम ३ ते ४ तास चालेल. भूमिपूजनाच्या या कार्यक्रमासाठी काशीवरून पुजारी बोलवण्यात येणार आहेत. ५ ऑगस्टला सकाळी ८ वाजता भूमिपूजनाचा कार्यक्रम सुरू होणार आहे. राम मंदिर ट्रस्टकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींना निमंत्रण पाठवण्यात आलं आहे. 

शनिवारी राम मंदिर ट्रस्टची बैठक झाली, या बैठकीत भूमिपूजनासाठी ३ ऑगस्ट आणि ५ ऑगस्ट या २ तारखांचा पर्याय ठेवण्यात आला होता. भूमिपूजनाच्या तारखेचा अंतिम निर्णय पंतप्रधान कार्यालय घेणार होतं.

मंदिराच्या मॉडेलमध्ये बदल

श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टची बैठक संपल्यानंतर महासचिव चंपत राय यांनी माध्यमांशी संवाद साधला. राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या तारखेसाठी पर्याय ठेवले आहेत. याबाबत पंतप्रधान कार्यालय शेवटचा निर्णय घेईल, असं चंपत राय म्हणाले. तसंच प्रस्तावित राम मंदिर मॉडेल १२८ फूट उंच आहे, पण ही उंची आता १६१ फूट उंच करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गर्भगृहाजवळ ५ घुमट बनवण्यात येतील, असंही चंपत राय म्हणाले.

मंदिर निर्माणासाठी मातीची ताकद किती आहे, याचे रिपोर्ट येणं बाकी आहे. यानंतर पाया किती ठेवायचा, याबाबतचा निर्णय घेतला जाईल. ६० मीटर खालून मातीचे सॅम्पल घेतले जातील. या कामासाठी एल ऍण्ड टी कंपनीची निवड केली असल्याचं चंपत राय यांनी सांगितलं. 

मंदिर उभारणीला किती वेळ?

राम मंदिराचं बांधकाम ज्या दिवशीपासून सुरू होईल, तेव्हापासून मंदिर पूर्ण व्हायला जवळपास साडेतीन वर्षाचा कालावधी लागेल. तसंच मंदिर उभारणी करताना वर्गणीही गोळा केली जाईल, अशी माहिती मिळत आहे. 

राम मंदिराचं मॉडेल तयार 

प्रस्तावित राम मंदिराचं मॉडेल तयार झालं आहे. प्रसिद्ध आर्किटेक्ट सीबी सोनपुरा यांनी मंदिराचं मॉडेल तयार केलं आहे. गुजरातमध्ये राहणाऱ्या सीबी सोनपुरा यांच्या पुर्वजांनी सोमनाथ मंदिराचंही मॉडेल तयार केलं होतं. अयोध्येमध्येही सोनपुरा कुटुंब कार्यशाळेत आजही काम करत आहे. या मॉडेलमध्ये राम मंदिर दोन मजली दाखवण्यात आलं आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बैठकीमध्ये राम मंदिर भूमिपूजनाच्या कार्यक्रमाच्या रुपरेखेवर चर्चा झाली. भूमिपूजनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबरच प्रमुख पाहुण्यांच्या यादीबाबतही चर्चा करण्यात आली. सरसंघचालक मोहन भागवत यांनाही भूमिपूजनाचं निमंत्रण देण्यात येईल, असं सांगण्यात येतंय.

भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी विश्व हिंदू परिषदेची केंद्रीय टीम, देशातले प्रमुख साधू संत आणि अयोध्या आंदोलनाशी जोडले गेलेल्यांनाही आमंत्रण दिलं जाईल. याशिवाय अयोध्या आंदोलनात मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांनाही विशेष आमंत्रण दिलं जाण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. 

अयोध्येत गर्भगृहात राम मंदिर निर्माणाच्या कामासोबतच ६७ एकर क्षेत्रात राम मंदिर परिसराचंही काम सुरू करण्यात येणार आहे.