चॅम्पियन्स ट्रॉफीवरुन वाद सुरु असतानाच मोदींची पाकिस्तानवर आगपाखड, म्हणाले 'त्यांना इतिहासातून...'

Narendra Modi on Pakistan: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी कारगिल विजय (1999 Kargil War) दिवसाच्या निमित्ताने शहिदांना आदरांजली वाहिली असून, पाकिस्तानवर (Pakistan) जोरदार टीका केली आहे. इतकं नुकसान होऊनही पाकिस्तानने काहीच धडा घेतलेला नसून, अद्यापही दहशतवाद्यांना मदत करत आहे असं नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.   

शिवराज यादव | Updated: Jul 26, 2024, 11:49 AM IST
चॅम्पियन्स ट्रॉफीवरुन वाद सुरु असतानाच मोदींची पाकिस्तानवर आगपाखड, म्हणाले 'त्यांना इतिहासातून...' title=

Narendra Modi on Pakistan: भारतीय क्रिकेट संघ (Indian Cricket Team) चॅम्पिअन्स ट्रॉफी (Champions Trophy) खेळण्यासाठी पाकिस्तानात जाणार की नाही याबद्दल चर्चा रंगलेली असतानाच नरेंद्र मोदी यांनी शेजारी राष्ट्रावर जोरदार टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी कारगिल विजय (1999 Kargil War) दिवसाच्या निमित्ताने शहिदांना आदरांजली वाहिली असून, पाकिस्तानवर (Pakistan) आगपाखड केली आहे. इतकं नुकसान होऊनही पाकिस्तानने काहीच धडा घेतलेला नसून, अद्यापही दहशतवाद्यांना मदत करत आहे असं नरेंद्र मोदी म्हणाले आहेत. चॅम्पिअन्स ट्रॉफी पाकिस्तानात खेळवली जाणार असून, ताणलेले संबंध पाहता भारतीय संघ तिथे जाण्याची शक्यता कमीच आहे. अंतिम निर्णय केंद्र सरकार घेणार असून, नरेंद्र मोदी यांच्या विधानाने हा निर्णय नेमका काय असू शकतो याचा अंदाज दिला आहे. 

कारगिल युद्ध स्मारक येथे पंतप्रधान मोदी म्हणाले, "जेव्हाही पाकिस्तानने कोणतेही दुस्साहस केले तेव्हा त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. त्यांनी इतिहासातून कोणताही धडा घेतलेला नाही". युद्धात शहीद झालेल्या भारतीय जवानांना श्रद्धांजली वाहताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, त्यांनी देशासाठी दिलेले बलिदान अमर आहे आणि कारगिल विजय दिवसाच्या रूपाने ते सदैव स्मरणात राहील.

"आम्ही फक्त कारगिलचे युद्ध जिंकले नाही. आम्ही सत्य, संयम आणि शक्तीचे अप्रतिम प्रदर्शन केले होते. तुम्हाला माहिती आहेच की, भारत त्यावेळी शांततेसाठी प्रयत्न करत होता, त्या बदल्यात पाकिस्तानने पुन्हा एकदा आपला अविश्वासू चेहरा दाखवला. पण सत्यासमोर असत्याचा आणि दहशतवादाचा पराभव झाला. यापूर्वी पाकिस्तानने जितके प्रयत्न केले, त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले पण पाकिस्तानने आपल्या इतिहासातून काहीही शिकलेले नाही. दहशतवाद आणि प्रॉक्सी वॉरच्या सहाय्याने स्वतःला सुसंगत ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे, पण आज जेव्हा मी अशा ठिकाणाहून बोलतोय जिथे दहशतवादाचे धनी माझा आवाज थेट ऐकू शकतात, तेव्हा मला या दहशतवादाच्या समर्थकांशी बोलायचे आहे त्यांच्या नापाक योजना कधीही यशस्वी होणार नाहीत. आमचे शूर जवान दहशतवादाला पूर्ण ताकदीने चिरडून टाकतील. शत्रूला चोख प्रत्युत्तर दिले जाईल. लडाख असो वा जम्मू-काश्मीर, भारत आपल्या विकासासमोरील प्रत्येक आव्हानाचा पराभव करेल".

26 जुलै 1999 रोजी, भारतीय सैन्याने लडाखमधील कारगिलच्या बर्फाळ उंचीवर सुमारे तीन महिने चाललेल्या लढाईनंतर विजय घोषित केला होता. भारताने पाकिस्तानवर युद्धात मिळवलेल्या विजयाच्या स्मरणार्थ 'कारगिल विजय दिवस' पाळला जातो.