सुप्रीम कोर्टाने विरोधकांना दणका दिल्यानंतर PM मोदींनी लगावला टोला, म्हणाले "भ्रष्टाचाराने भरलेले..."

PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी तेलंगणात (Telangaan) 11 हजार 300 कोटींच्या विकासकामाचं भुमीपूजन केलं. यावेळी त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला.  

शिवराज यादव | Updated: Apr 8, 2023, 06:23 PM IST
सुप्रीम कोर्टाने विरोधकांना दणका दिल्यानंतर PM मोदींनी लगावला टोला, म्हणाले "भ्रष्टाचाराने भरलेले..." title=

PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी केंद्रीय तपास यंत्रणांच्या (central probe agencies) गैरवापराच्या मुद्द्यावरुन विरोधकांवर निशाणा साधला आहे. केंद्र सरकार तपास यंत्रणांचा विरोधकांविरोधात गैरवापर करत असल्याचा आरोप करत विरोधकांनी सुप्रीम कोर्टात (Supreme Court) धाव घेतली होती. मात्र सुप्रीम कोर्टाने ही याचिका फेटाळून लावली. यानंतर विरोधक पुन्हा नव्याने याचिका करण्याच्या तयारीत आहे. दरम्यान यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टोला लगावला आहे. सुप्रीम कोर्टाने याचिका नाकारत त्यांना मोठा धक्का दिल्याचं नरेंद्र मोदी म्हणाले आहेत. 

"काही दिवसांपूर्वी काही विरोधी पक्षांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. भ्रष्टाचाराने भरलेल्या आपल्या कृत्यांना संरक्षण मिळावं अशी त्यांची अपेक्षा होती. त्यांनी कोर्टात धाव घेतली होती, पण कोर्टाने त्यांना धक्का दिला," असं नरेंद्र मोदी म्हणाले आहेत. हैदराबामध्ये बोलत असताना त्यांनी भ्रष्टाचार आणि घराणेशाहीवरुन विरोधकांवर टीका केली. 

अलीकडेच काँग्रेसच्या नेतृत्वाखालील तब्बल 14 राजकीय पक्षांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. विरोधी राजकीय नेते आणि इतर नागरिकांविरोधातील कारवायांमध्ये वाढ झाली असून त्यांच्या असहमत असण्याच्या अधिकाराचा वापर करण्यापासून रोखलं जात असल्याचा आरोप केला. मात्र सुप्रीम कोर्टाने ही याचिका दाखल करुन घेण्यास नकार दिला. फक्त राजकीय नेत्यांना संरक्षण दिलं जाऊ शकत नाही असं स्पष्ट मत सुप्रीम कोर्टाने मांडलं. 

केंद्रीय तपास यंत्रणाच्या कथित गैरवापराविरोधात १४ विरोधी पक्षांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. केंद्र सरकारविरोधात मतप्रदर्शन करण्याचा राजकीय नेत्यांना तसंच नागरिकांना मूलभूत अधिकार आहे असं याचिकेत सांगण्यात आलं होतं. विरोध करणारा आवाज दाबून टाकण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणा नेत्यांना अटक करत असल्याचा दावा याचिकेद्वारे करण्यात आला होता.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेलंगणात 11 हजार 300 कोटींच्या प्रकल्पांचं भुमीपूजन केलं. यावेळी त्यांनी सिकंदराबाद-तिरुपती वंदे भारत एक्स्प्रेसलाही हिरवा झेंडा दाखवला. 

नरेंद्र मोदी यांनी यावेळी तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रेशेखर राव यांच्या नेतृत्वातील बीआरएस सरकारला राज्यातील जनतेसाठी करत असलेल्या विकासात कोणताही अडथळा आणू नका असी विनंती केली. दाक्षिणात्य राज्यांसाठी आखण्यात आलेल्या योजनांमध्ये सरकार सहकार्य करत नसल्याने आपल्याला वेदना होत असल्याचं मोदी यावेळी म्हणाले. दरम्यान मोदींनी यावेळी कोणाचंही नाव न घेता काही लोक घराणेशाहीला पाठबळ देत असल्याची टीका केली. तेलंगणाच्या लोकांसाठी राबवण्यात आलेल्या प्रकल्पांचा ते लाभ घेऊ इच्छित आहेत असं ते म्हणाले.