चांद्रयान 3 ने चंद्रावर यशस्वीपणे लँडिंग केली असून इतिहास रचला आहे. भारताच्या या कामगिरीने संपूर्ण जगाला आपली दखल घेण्यास भाग पाडलं. इस्त्रोमध्ये लँडिगंच लाईव्ह सुरु असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी दक्षिण आफ्रिकेत असून, व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून हजेरी लावली. नरेंद्र मोदी यांनी लँडिगनंतर प्रतिक्रिया देताना जेव्हा आपण असा इतिहास घडताना पाहतो तेव्हा आयुष्य धन्य होतं अशा भावना व्यक्त केल्या आहेत.
चांद्रयान 3 ने चंद्राच्या दक्षिण ध्रुवाकडील पृष्ठभागावर यशस्वीपणे लँडिंग केल्यानंतर वैज्ञानिकांनी एकच जल्लोष करण्यास सुरुवात केली. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वैज्ञानिकांचं कौतुक करत हा फार अविस्मरणीय क्षण असल्याचं सांगितलं. ते म्हणाले की, "जेव्हा आपण आपल्या डोळ्यांनी असा इतिहास घडताना पाहतो तेव्हा आयुष्य धन्य होतं. अशा ऐतिहासिक घटना राष्ट्रजीवनाची चिरंजीव चेतना होतात. हे क्षण फार अविस्मरणीय, अभुतपूर्व विकसित भारताच्या शंखनादाचे आहेत. अडचणींचा महासागर आपण पार केले आहेत. हा क्षण विजयाच्या चंद्रपथावर चालण्याचा, 140 कोटींच्या ह्रदयाच्या सामर्थ्याचा आहे. हा क्षण नवी ऊर्जा. नवा विश्वास, नव्या चेतनेचा आहे".
Historic day for India's space sector. Congratulations to @isro for the remarkable success of Chandrayaan-3 lunar mission. https://t.co/F1UrgJklfp
— Narendra Modi (@narendramodi) August 23, 2023
पुढे ते म्हणाले की "आम्ही पृथ्वीवर संकल्प केला आणि चंद्रावर साकार केला. भारत आता चंद्रावर आहे असं आपल्या वैज्ञानिकांनीही सांगितलं आहे. आपण भारताच्या नव्या उड्डाणाचे साक्षीदार झालो आहोत".
"मी दक्षिण आफ्रिकेत आहे, पण प्रत्येक भारतीयाप्रमाणे माझं मनही चंद्राच्या मोहीमेकडे होतं. प्रत्येक भारतीय जल्लोष करत असून, उत्सव साजरा करत आहे. मीदेखील आपल्या देशवासियांह, कुटुंबासह या आनंदाशी जोडलो आहे. मी इस्रो, देशातील सर्व वैज्ञानिकांना शुभेच्छा देतो, ज्यांनी या क्षणासाठी वर्षानुवर्षं मेहनत घेतली. या क्षणासाठी मी 140 कोटी देशवासियांनाही शुभेच्छा देतो, " असं मोदी म्हणाले.
"वैज्ञानिकांनी घेतलेली मेहनत आणि प्रतिभेमुळे भारत चंद्राच्या त्या दक्षिण ध्रुवावर पोहोचला आहे जिथे आजपर्यंत कोणताही देश जाऊ शकलेला नाही. आता चंद्रासंबंधी समजूती, गोष्टी बदलतील. आता नव्या पिढीसाठी गोष्टी बदलतील. भारतात पृथ्वीला आई आणि चंद्राला मामा म्हणतो. 'चंदामामा दूर के है' असं आधी म्हटलं जात होतं. पण आता एक दिवस येईल जेव्हा लहान मुलं म्हणतील 'चंदामामा बस एक टूर के है'," असं नरेंद्र मोदींनी सांगितलं.