नवी दिल्ली : काँग्रेसप्रणित विरोधकांची महाआघाडी म्हणजे महाभेसळ असल्याची जोरदार टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी लोकसभेत बोलताना केली. काँग्रेस सरकारच्या काळात एकही संरक्षण करार दलालीशिवाय झाला नसल्याचा खळबळजनक आरोपही त्यांनी यावेळी केला. वायू दल मजबूत व्हावं असं काँग्रेसला वाटत नाही, अशा शब्दांत त्यांनी हल्ला चढवला. काँग्रेसचा भ्रष्टाचार उघडकीला आणू शकतील, असे तीन साक्षीदार सरकारनं पकडल्यामुळं काँग्रेस भयभीत झालीय. मोठमोठ्या लोकांच्या मालमत्ता, संपत्ती जप्त होत आहेत, असं सांगत त्यांनी रॉबर्ट वाड्रा यांचं नाव न घेता काँग्रेसवर टीका केली. राष्ट्रपतीच्या अभिभाषणावरील अभिनंदन प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते. सत्ताभोगामुळं काँग्रेसमध्ये विकृती आल्याचं सांगत काँग्रेसमुक्त भारताचं महात्मा गांधींचं स्वप्न आम्ही पूर्ण करू, असंही ते म्हणाले.
या दरम्यान त्यांनी केंद्र सरकारद्वारे आखण्यात आलेल्या विकास कार्यांचा उल्लेख केलाच परंतु, काँग्रेसवरही जोरदार हल्लाबोल केला. या भाषणा दरम्यान पंतप्रधान मोदींनी दोन बॉलिवूड गाण्यांचीही आठवण झाली... त्यातलं पहिलं गाणं म्हणजे 'पीपली लाईव्ह' या सिनेमातलं 'महंगाई डायन खाए जात है...' आणि दुसरं म्हणजे, 'रोटी कपडा और मकान' सिनेमातलं 'बाकी कुछ बचा तो महंगाई मार गई...'
या दोन्ही गाण्यांचा उल्लेख करताना मोदी म्हणताना 'हे दोन्ही गाणे आले तेव्हा कुणाचं सरकार होतं?' असा सवालही केला. 'बाकी कुछ बचा तो महंगाई मार गई... हे गाणं आलं तेव्हा इंदिराजींचं सरकार होतं तर दुसरं गाणं आलं तेव्हा काँग्रेसचं रिमोट कंट्रोल सरकार होतं' असं म्हणत त्यांनी काँग्रेसवर टीका केली.
यावेळी पंतप्रधान मोदींनी संसदेत एका कवितेच्या काही ओळीही ऐकवल्या. 'सूरज जायेगा भी तो कहां, उसे यहीं रहना होगा. यहीं हमारी सांसों में, हमारी रगों में, हमारे संकल्पों में, हमारे रतजगों में. तुम उदास मत होओ, अब मैं किसी भी सूरज को नहीं डूबने दूंगा' ही हिंदीतले प्रसिद्ध कवि सर्वेश्वरदयाल सक्सेना यांची कविताही म्हटली.