Video : पंतप्रधान मोदींना पाहताच जॉर्जिया मेलोनी यांच्याकडून हात जोडून नमस्कार, मनापासून स्वागत... भेटीची एकच चर्चा

Narendra Modi Meets Giorgia Meloni : पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांचा पहिला आंतरराष्ट्रीय दौरा चर्चेचा विषय ठरत आहे.  

सायली पाटील | Updated: Jun 15, 2024, 07:58 AM IST
Video : पंतप्रधान मोदींना पाहताच जॉर्जिया मेलोनी यांच्याकडून हात जोडून नमस्कार, मनापासून स्वागत... भेटीची एकच चर्चा  title=
PM Narendra Modi Meets Italy pm Giorgia Meloni in g7 Video viral

Narendra Modi Meets Giorgia Meloni : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नाव जगभरात प्रसिद्धीझोतात आलं असून, अगदी युरोपीय देशांमध्येसुद्धा मोदींच्याच नावाची चर्चा पाहायला मिळते. भारताच्या पंतप्रधानपदी तिसऱ्यांदा विराजमान होण्याचा मान मिळवणाऱ्या पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर काही महत्त्वाच्या कामांवर लक्ष केंद्रीत करण्यास सुरुवात केली. इथं भारतात शेतकऱ्यांसाठीच्या योजनेमध्ये लक्ष घालत त्यांनी मोठ्या निधीला मंजुरी दिली. तर, तिथं पंतप्रधानांनी आंतरराष्ट्रीय दौरेही सुरु केले. 

सध्या मोदी जी7 शिखर परिषदेच्या निमित्तानं इटलीला पोहोचले असून, तिथं त्यांनी जागतिक स्तरावरील महत्त्वाच्या नेतेमंडळींची भेट घेतली. ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्यामागोमाग आता मोदींनी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांचीसुद्धा भेट घेतली. मोदींना येताना पाहताच मेलोनी यांनी आनंदानं पुढे होत त्यांचं आपल्या देशात स्वागत केलं. 

दोन्ही हात जोडून मेलोनी यांनी मोदींना अभिवादन केलं आणि त्यांच्याशी स्वागतपर संवाद साधला. मोदींना इटलीमध्ये मिळालेल्या या स्वागताचा व्हिडीओ वृत्तसंस्थांनी शेअर करताच सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. अनेकांनी या व्हिडीओवर प्रतिक्रियाही दिल्याचं पाहायला मिळलं. 

कुठे आयोजित करण्यात आली आहे जी7 शिखर परिषद? 

इटलीच्या अपुलिया येथे G7 summit चं आयोजन करण्यात आलं असून, या परिषदेसाठी जगभरातील नेतेमंडळी आणि देशांच्या प्रतिनिधींनी हजेरी लावली आहे. पण, या साऱ्यामध्ये चर्चा रंगतेय ती म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मेलोनी यांच्या भेटीची. इथं मोदी आणि मेलोनी यांची भेट झाल्यानंतर सोशल मीडियावर असंख्य चर्चा रंगत असतानाच तिथं मोदी देशांच्या प्रतिनिधींचीही भेट घेताना दिसत आहेत. 

हेसुद्धा वाचा : सिक्योरीटी गार्डच्या मुलाने उधारींच्या पुस्तकांवर केला अभ्यास, पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण

 

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रो, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक, युक्रेनचे राष्ट्रपती झेलेन्स्की अशा नेत्यांची भेट घेत मोदींनी भारताशी असणारं या देशांचं नातं आणखी घट्ट केल्याचं पाहायला मिळालं. रशिया- युक्रेन युद्ध, धुमसत असतानाच या परिस्थितीमध्येही पंतप्रधानांनी झेलेन्स्की यांची भेट घेतल्याचं पाहायला मिळालं. या भेटीनंतर त्यांच्यामध्ये द्वीपक्षीय चर्चाही झाल्याचं वृत्त समोर आलं. 

दरम्यान, इटलीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या जी7 शिखर परिषदेमध्ये जर्मन चान्सलर ओलाफ स्कोल्ज, जपानचे पंतप्रधान फूमियो किशिगा, युरोपीय आयोगाच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयेन आणि युरोपीय परिषदेचे अध्यक्ष चार्ल्स मिशेल या नेत्यांचीही उपस्थिती पाहायला मिळाली. 10 आऊटरिच देशांच्या प्रतिनिधींनी या परिषदेसाठी हजेरी लावल्याचं सांगण्यात येत असून, या परिषदेतून आता जागतिक दृष्टीनं नेमक्या कोणत्या चर्चा होतात यावर अनेकांचं लक्ष लागलं आहे.