भारतात मुस्लिमांचं भविष्य काय? पारशी समाजाचा उल्लेख करत मोदी म्हणाले, 'जगभरात अनेक...'

PM Modi On Future of Muslim In India: पंतप्रधान नरेंद्र मोदींना भारतामधील मुस्लिमांसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी सूचक शब्दांमध्ये यावर उत्तर दिलं.

स्वप्निल घंगाळे | Updated: Dec 21, 2023, 10:54 AM IST
भारतात मुस्लिमांचं भविष्य काय? पारशी समाजाचा उल्लेख करत मोदी म्हणाले, 'जगभरात अनेक...' title=
मुलाखतीत मोदींनी व्यक्त केलं मत

PM Modi On Future of Muslim In India:  2024 मध्ये तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होण्यासाठी नरेंद्र मोदी सज्ज असून त्यांच्या देहबोलीमधून तो आत्मविश्वास दिसून येत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. नरेंद्र मोदींनीही मागील 10 वर्षांच्या तुलनेत आगामी वर्षांमध्ये भारताच्या लोकांच्या अपेक्षा फारच वेगळ्या असतील, असं म्हटलं आहे. फायनॅनशिअल टाइम्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये पंतप्रधान मोदींनी, "आपला देश मोठी झेप घेण्यासाठी तयार आहे याचा अंदाज आता लोकांना आहे. या उड्डाणाला वेग मिळवून द्यावा असी त्यांची इच्छा आहे. तसेच हा वेग मिळवून देण्यासाठी सर्वोत्तम पक्ष आमचाच आहे असून आम्हीच त्यांना इथवर घेऊन आलोय हे सुद्धा त्यांना ठाऊक आहे," असं म्हटलं. पंतप्रधान मोदींना भारतातील मुस्लिमांसंदर्भातही प्रश्न विचारण्यात आला. मोदींनी याचं उत्तर देण्याऐवजी पारशी समाजाच्या आर्थिक विकासासंदर्भात भाष्य केलं.

पारशी समाजाचा उल्लेख करत विधान

भाजपाच्या कार्यकाळामध्ये मुस्लिमांसंदर्भात अनेकदा वेगवेगळ्या विषयांवरुन प्रश्न उपस्थित करण्यात आले. मुस्लिमांविरोधातील वक्तव्यांचा मुद्दा वेळोवेळी गाजला. भाजपावर टीका करणारे सध्या भाजपामध्ये एकही मुस्लीम खासदार किंवा मोठ्या पदावर असलेला मंत्री नाही असं म्हणतात. या मुलाखतीत यावरुनच पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारण्यात आला तर त्यांनी पारशी लोकांच्या विकासाचा मुद्दा उपस्थित करत त्यावर प्रतिक्रिया दिली. पारशी समाजाला भारतात राहणाऱ्या अल्पसंख्यांक समुहांपैकी एक समजलं जातं. पारश्यांची संख्या फार कमी आहे असं म्हणत पंतप्रधान मोदींनी सूचक शब्दांमध्ये आपलं म्हणणं मांडलं.

मुस्लिमांबद्दल काय म्हणाले?

देशातील 20 कोटी मुस्लिमांचा थेट कोणताही संदर्भ न देता पंतप्रधान मोदींनी, "जगभरामध्ये अनेक ठिकाणी छळ सहन केल्यानंतर त्यांना भारतात सुरक्षित आश्रय मिळाला. ते समाधानी आणि समृद्ध जीवन जगत आहेत. यावरुनच असं दिसून येत आहे की भारतीय समाजामध्ये कोणत्याही धार्मिक अल्पसंख्यांकांविरुद्ध भेदभावाची भावना मनात नाही," अशी प्रतिक्रिया नोंदवली. 

विरोधकांविरुद्ध कारवाईबद्दलही भाष्य

विरोधकांविरुद्ध होत असलेल्या कठोर कारवाईवरुन सत्ताधाऱ्यांवर टीका होत असल्याचा संदर्भ देत पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारण्यात आला. यावर पंतप्रधानांनी ही एक इको सिस्टीम असल्याचं म्हटलं. विरोधक सरकारवर आरोप करत असतात. असे आरोप करणे हा त्यांचा अधिकार आहे. मात्र पुराव्यांसहीत उत्तर देण्याचा तितकाच अधिकार सत्ताधाऱ्यांनाही आहे, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

कायमच भारताला कमी लेखलं

बाहेरुन भारतात आलेल्या लोकांनी कायमच भारताला कमी लेखल्याचंही पंतप्रधान म्हणाले. "1947 साली जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा देश सोडणाऱ्या इंग्रजांनी भारताबद्दल धोकादायक भविष्यवाणी केली होती. मात्र ती भविष्यवाणी आणि दृष्टीकोन सारं काही चुकल्याचं आपण पाहिलं," असं मोदी म्हणाले. याचप्रमाणे आज जे लोक आपल्या सरकावर शंका घेत आहेत ते भविष्यात नक्कीच चुकीचे ठरतील असा विश्वास पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला.