कोरोनावरील लस कुठवर पोहोचली, पंतप्रधान मोदींचे अधिकाऱ्यांना 'हे' आदेश

लस वितरणासाठी... 

Updated: Oct 18, 2020, 08:07 AM IST
कोरोनावरील लस कुठवर पोहोचली, पंतप्रधान मोदींचे अधिकाऱ्यांना 'हे' आदेश  title=
संग्रहित छायाचित्र

नवी दिल्ली : एकिकडे देशात coronavirus कोरोना अधिक बळावत असतानाच दुसरीकडे या विषाणूचा संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठीचे प्रयत्न कसोशीनं सुरु आहेत. बऱ्याच अंशी या प्रयत्नांना यशही मिळताना दिसू लागलं आहे. याच परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आणि कोरोनावरील प्रतिबंधात्मक लस कुठवर पोहोचली याचा आढावा घेण्यासाठी म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधिकाराऱ्यांसोबत एक आढावा बैठक घेतली. लस उपलब्ध होताच ती देशातील सर्व नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वितरणाच्या व्यवस्थेवरही काम करणं गरजेचं असल्याचं म्हणत त्यांनी अधिकाऱ्यांना त्यासंबंधीचे आदेशही दिल्याचं म्हटलं जात आहे. 

लस वितरणाची योग्य व्यवस्था पाहिजे 

देशातील भौगोलिक परिस्थिती आणि विविधता लक्षात घेता ही लस अधिक वेगानं सर्वांपर्यंत पोहोचेल ही बाब निश्चित करणं गरजेचं आहे, असं मोदींचं स्पष्ट मत आहे. खर्च, वितरण आणि प्रशासकीय स्तरावर सर्वच बाबतीत आपण काटेकोर नियम लागू केले पाहिजेत हा मुद्दा त्यांनी अधोरेखित केला. कोल्ड स्टोरेज चेन, डिस्ट्रीब्यूशन नेटवर्क, मॉनिटरींग मॅकेनिदम, ऍडवांस असेसमेंट आणि आवश्यक यंत्रणा तयार करण्यासाठी त्यापूर्वीच सर्व आखणी करणं अपेक्षित असल्याचं त्यांनी सांगितलं. 

हलगर्जीपणा करु नका... 

कोरोना व्हायरसच्या बाबतीत कोणत्याही बाबतीत हलगर्जीपणा करु नका, असं सांगत या विषाणूला नियंत्रणात आणण्यासाठीचे सर्व प्रयत्न सुरु ठेवण्याचं आवाहन त्यांनी केलं. शिवाय सण- उत्सवांच्या या आगामी दिवसांमध्ये कोविड 19 बाबत आखण्यात आलेल्या सर्वच अटी आणि नियमांचं पालन केलं गेलंच पाहिजे यासाठी मोदी आग्रही असल्याचं पाहायला मिळालं. यावेळी मास्कचा वापर आणि स्वच्छतेवर त्यांनी भर दिला. 

 

देशात ३ लसींवर सुरु आहे काम 

मोदींसोबतच्या या बैठकीतून समोर आलेल्या माहितीनुसार सध्याच्या घडीला देशात एकूण ३ लसींची चाचणी यशस्वी टप्प्यावर आहे. ज्यापैकी २ लसी दुसऱ्या आणि एक लस ही तिसऱ्या टप्प्यामध्ये आहे.