नवी दिल्ली : दिवाळीचा उत्साह संपूर्ण देशभरात पहायला मिळत आहे. सर्वजण दिवाळी साजरी करत असताना मात्र, भारतीय सैन्याचे जवान देशाच्या सुरक्षेसाठी दिवस-रात्र सीमेवर पहारा देत असतात. त्यामुळेच जवानांना दिवाळीचा आनंद लुटता येत नाही. म्हणूनच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जवानांसोबत दिवाळी साजरी करण्याचा निर्णय घेतला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जवानांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी काश्मीरमधील गुरेजमध्ये दाखल झाले. गुरुवारी सकाळी १०.४७ मिनिटांच्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरेजमध्ये पोहोचले. यावेळी नरेंद्र मोदी यांनी जवळपास दोन तास सीमेवरील जवानांसोबत उपस्थित होते.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सैनिकांना संबोधित करताना म्हटलं की, मला कुटूंबासोबत दिवाळी साजरी करायची होती. तुम्ही सर्व माझ्या परिवारासारखेच आहात. सैनिकांसोबत दिवाळी साजरी केल्याने एक नवी ऊर्जा मिळते. न्यू-इंडिया म्हणजेच नवा भारत देश घडविण्यात भारतीय सैन्याचंही मोठं योगदान आहे असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
#WATCH: PM Narendra Modi celebrate #Diwali with jawans in Gurez Valley, near LoC, in J&K pic.twitter.com/gu2HxLRtq0
— ANI (@ANI) October 19, 2017
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जवानांसोबत साधलेल्या संवादातील महत्वाचे मुद्दे
- जवानांसोबत हात मिळविल्याने ऊर्जा मिळते
- सैनिकांचं आयुष्य एक तपस्या आहे
- सीमेवर सुरक्षा करणं सैनिकांचं आयुष्य आहे
- तुम्ही एक पाऊल चालाल तर देश सव्वाशे कोटी पाऊल चालेल
- जवानांच्या समस्या सोडविण्यासाठी सरकार कटीबद्ध आहे
- मी एकही दिवाळी आपल्या मुख्यालयात साजरी केली नाही तर प्रत्येक दिवळी सीमेवर सैन्यासोबत साजरी केली
- 'वन रँक-वन पेन्शन' योजना रखडली होती मात्र, आमच्या सरकारने लागू केली याचा मला आनंद आहे
- सर्व सैन्यदलाला दिवाळीच्या शुभेच्छा
नरेंद्र मोदी पंतप्रधान बनल्यानंतर २०१४ साली त्यांनी सियाचीनमध्ये सैन्य दलासोबत दिवाळी साजरी केली होती. त्यानंतर २०१५ साली डोगराई वार मेमोरियल येथे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जवानांसोबत दिवाळी साजरी केली. तर, गेल्या वर्षी म्हणजेच २०१६ साली दिवाळीच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हिमाचल प्रदेशमध्ये तैनात आयटीबीपीच्या जवानांसोबत दिवाळी साजरी केली.