नवी दिल्ली : संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवशेन विरोधकांनी गोंधळ घालून वाया घालवल्याने भाजपचं देशव्यापी उपोषण आंदोलन आजपासून होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीही उपवास करणार आहेत. दरम्यान, उपोषणाच्या राजकारणानं ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे व्यथित झालेत.विरोधी पक्षांनी गोंधळ घालून संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात कामकाज रोखून धरल्याचा निषेध करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाचे सर्व खासदार आज दिवसभर उपोषण करणार आहे. पंतप्रधान दैनंदिन कामात व्यग्र राहूनच उपवास करणार आहेत. तामिळनाडू चेन्नईत भरलेल्या डिफेन्स एक्स्पो 2018चं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.
याशिवाय पंतप्रधानांच्या अधिकाऱ्यांसोबत पूर्वनियोजित बैठकांच्या आणि कार्यालयीन कामकाजातही कुठलाही बदल करण्यात आलेला नाही. भाजप अध्यक्ष अमित शाह हे कर्नाटकात हुबळीला उपोषणाला बसणार आहेत. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विलेपार्लेमध्ये उपोषणात सहभागी होतील.
दरम्यान, भाजपचे खासदार करत असलेले उपोषण हे ढोंग असल्याची टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेय. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे राज्यभर सुरु असलेल्या हल्लाबोल यात्रेच्या पुण्यातील सभेत त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, धनंजय मुंडे, जयंत पाटील, सुनील तटकरे उपस्थित होते. त्यांनीही मोदी आणि भाजपवर जोरदार टीका केली.