Kashi Vishwanath Dham : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काशी विश्वनाथ धामच्या पहिल्या टप्प्याचं (Kashi Vishwanath Corridore inaugurated) आज उद्घाटन करण्यात आलं. 'काशी विश्वनाथ धाम' प्रकल्प पाच लाख चौरस फुटांमध्ये पसरलेला आहे. याशिवाय भाविकांसाठी अनेक सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत.
काशी विश्वनाथ धामच्या लोकार्पणासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ते बांधणाऱ्या कामगारांना कधीही न विसरता येणारी अशी भेट दिली. कार्यक्रमानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काशी विश्वनाथ धाम कॉरिडॉरच्या बांधकामातील मजुरांसोबत भोजन केलं. याआधी प्रयागराजच्या कुंभमेळ्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी साफसफाई कामगारांचे पाय धुवून सन्मान केला होता.
लोकार्पणानंतर कामगारांवर फुलांचा वर्षाव करण्यात आला. त्याचसोबत त्यांचं फोटो सेशनही केलं. आपल्या भाषणात पंतप्रधानांनी कामगारांचा उल्लेख करून आणि त्यांच्यासोबत भोजन करून जनतेला मोठा संदेश देण्याचा प्रयत्न केला. कारागीर-मजुरांसोबत जेवण करून पंतप्रधानांनी त्यांना समान दर्जा देण्याचा प्रयत्न केला.
वाराणसीचे खासदार आणि पंतप्रधान मोदी यांचा हा आदरातिथ्य पाहून कारागीर आणि मजूरही आनंदित झाले. जेवणाच्या पंगतीत केवळ मजूरच नाही तर स्वच्छता कर्मचारी आणि इतर कामातील कामगारही सहभागी झाले होते. पीएम मोदींचे कामगारांसोबत जेवताणाचे फोटो सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत.
जेवणापूर्वी पीएम मोदींनी मजुरांवर फुलांचा वर्षावही केला. आपल्या भाषणातही पीएम मोदींनी मजुरांना विशेष श्रेय दिलं. या भव्य संकुलाच्या उभारणीत ज्यांनी घाम गाळला आहे अशा प्रत्येक कष्टकरी बंधू-भगिनींबद्दल आज मला कृतज्ञता व्यक्त करायची आहे असं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं.
पंतप्रधान मोदी यांच्यासोबतच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही कामगारांसोबत जेवण केलं. 2500 मजुरांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती.