नवी दिल्ली : पेट्रोल-डिझेलचे दर रोज बदलण्याच्या निर्णयाची मागच्या आठवड्यापासून अंमलबजावणी करायला सुरुवात झाली. या निर्णयाचा फायदा ग्राहकांना झाल्याचं पाहायला मिळत आहे. रोजच्या दर बदलांमुळे पेट्रोल १.७७ रुपयांनी स्वस्त झालं आहे तर डिझेल ८८ पैशांनी स्वस्त झालं आहे.
१६ जूनपासून रोज सकाळी सहा वाजता पेट्रोल-डिझेलचे दर ठरवले जातात. १६ जूनला पेट्रोलची किंमत ६५.४८ होती तर आज हीच किंमत ६३.७१ रुपये आहे. १६ जूनला डिझलचे दर ५४.४९ रुपये होते आणि आज हीच किंमत ५३.६१ रुपये आहे.
याआधी महिन्याच्या एक आणि १६ तारखेला पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये बदल व्हायचे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाचे दर कमी झाले तरी १५ दिवसानंतरच ग्राहकांना याचा फायदा मिळायचा. पण आता लगेचच ग्राहकांना याचा फायदा मिळाला लागल्याचं तेल कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितलं आहे. पेट्रोलच्या किंमतीमध्ये प्रत्येक दिवसाला ११ पैसे ते ३२ पैशांची घसरण झाली आहे. तर डिझेलच्या किंमतीमध्ये प्रत्येक दिवसाला २ पैसे ते १८ पैशांची घसरण झाली आहे.