मुंबई : पेट्रोल आणि डिझेल दरवाढीचा फटका जसा सर्वसामान्यांना बसतोय तसा तो राज्याच्या सीमाभागातील पेट्रोलपंप मालकांनाही बसत आहे. याचा परिणाम प्रामुख्यानं गुजरात आणि महाराष्ट्र सीमेवर दिसून येत आहे. महाराष्ट्र आणि गुजरात ही शेजारील राज्ये असूनही दोन्ही राज्यांतील पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये मोठी तफावत आहे. गुजरात राज्यात पेट्रोल ७७.१३ रूपये लीटर आहे तर महाराष्ट्रात ८५.६० रूपये लीटर आहे.
गुजरात राज्याने पेट्रोलवरील कर कमी केल्याने येथील पेट्रोलच्या किंमती महाराष्ट्राच्या तुलनेत कमी आहेत. त्यामुळे दोन्ही राज्यांच्या सीमे शेजारील गुजरातमधल्या पेट्रोलपंपांची चलती सुरू आहे. तापी जिल्ह्यातील सीमावर्ती भागातील पेट्रोलपंप चालकांनी तर महाराष्ट्रापेक्षा स्वस्त दरात पेट्रोल मिळेल, अशी जाहिरातबाजी केली आहे. त्यामुळे उच्छल पेट्रोलपंपांवर वाहनांच्या रांगाच रांगा दिसतात.
महाराष्ट्रात इतर राज्याचा तुलनते सर्वांत महाग पेट्रोल मिळते, याला राज्याकडून लावण्यात आलेले विविध कर हेच एकमेव कारण आहे.याशिवाय राज्याकडून पेट्रोलवर 9 टक्के वेगळा सेस आकारला जातो. या नऊ टक्क्यांमध्ये तीन रुपये दुष्काळी कर, तीन रुपये महामार्गावरील दारूबंदीनंतर घटलेले उत्पादन भरून काढण्यासाठी लावलेला कर, एक रुपया शिक्षण, एक रुपया स्वच्छ भारत आणि एक रुपया कृषी कल्याण सेस घेतला जात असल्याने पेट्रोल भाव वाढले आहेत असे पेट्रोल पंपाचे मालिकानी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे..