लवकरच मिळणार पेट्रोल-डिझेलच्या दरात दिलासा, सरकारची मोठी तयारी; जाणून घ्या आजचा भाव

Petrol Diesel Price : देशात लवकरच पेट्रोल-डिझेलचे दर कमी होण्याची शक्यता आहे. तसेच खाद्यपदार्थांच्या महागाईतूनही दिलासा मिळू शकतो. भारत सरकार यावर काम करत असल्याची माहिती समोर आली आहे. अधिकारीही या योजनेवर काम करत आहेत.

आकाश नेटके | Updated: Aug 18, 2023, 08:59 AM IST
लवकरच मिळणार पेट्रोल-डिझेलच्या दरात दिलासा, सरकारची मोठी तयारी; जाणून घ्या आजचा भाव title=

Petrol Diesel Rate on 18 August 2023: देशातील तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे (Petrol Diesel Price) दर सकाळी ६ वाजता जाहीर करण्यात आले आहेत. शुक्रवार, 18 ऑगस्ट 2023 रोजी अनेक शहरांमध्ये इंधनाच्या दरांमध्ये बदल करण्यात आला आहे. काही मोठ्या शहरांमध्ये किमती वाढल्या आहेत, तर अनेक ठिकाणी भाव खाली आले आहेत. दुसरीकडे, गेल्या एक वर्षाहून अधिक काळ देशातील तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल केलेला नाही. 

दुसरीकडे, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या (Crude Oil) किंमतीबद्दल आजही घट झाली आहे. ब्रेंट क्रूड ऑइलच्या किमती 0.38 टक्क्यांनी कमी झाले आहे आणि ते प्रति बॅरल 83.80  डॉलरला विकले जात आहे. दुसरीकडे, डब्ल्यूटीआय क्रूड ऑइलबद्दल बोलायचे तर ते 0.36 टक्क्यांनी कमी झाले असून आणि ते प्रति बॅरल 80.10 डॉलरला विकले जात आहे.

देशातील महत्त्वाच्या चार महानगरांपैकी दिल्ली, कोलकाता आणि मुंबईमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमती स्थिर आहेत. मात्र चेन्नईत पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. चेन्नईमध्ये पेट्रोल 102.80 रुपये आणि 94.40 रुपये प्रति लीटर, 17 पैशांनी आणि डिझेल 16 पैशांनी महागले आहे. तर दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये आहे. मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपयांना विकले जात आहे. कोलकात्यात पेट्रोल 106.03 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर दराने उपलब्ध आहे.

दरम्यान, महागडे पेट्रोल आणि डिझेलपासून लोकांना लवकरच दिलासा मिळू शकतो. अन्न आणि इंधनाच्या किमतीत होणारी वाढ रोखण्यासाठी सरकार एक लाख कोटींची तरतूद करण्याची शक्यता आहे. ही रक्कम विविध मंत्रालयांच्या अर्थसंकल्पातून देण्याची योजना विचाराधीन आहे. सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या आठवड्यात यावर निर्णय घेऊ शकतात. या योजनेअंतर्गत पेट्रोल आणि डिझेलच्या विक्रीवरील कर कमी केला जाऊ शकतो. तसेच खाद्य तेल आणि गव्हावरील आयात शुल्कही कमी होऊ शकते.

मोदी सरकारचा निवडणुकीपूर्वी महागाई कमी करण्याचा मानस 

स्वातंत्र्यदिनी देशाला संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी महागाईशी लढण्याची शपथ घेतली होती. त्यानंतर अधिकारी या दिशेने वेगाने काम करत आहेत. त्यानंतर आता काही महिन्यांनी निवडणुका होण्याची शक्यता देखील आहे. त्यामुळे सरकार मतदारांना भाव कमी करुन मोठा दिलासा देण्याची शक्यता आहे.