Petrol Diesel Rate : लोकसभा निवडणूक संपताच पेट्रोलच्या किंमतीत वाढ, डिझेल 'इतक्या' रुपयांनी महागणार

Petrol Diesel Rate Today : कर्नाटकातील सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्याची घोषणा केली आहे.   

सौरभ तळेकर | Updated: Jun 15, 2024, 05:59 PM IST
Petrol Diesel Rate : लोकसभा निवडणूक संपताच पेट्रोलच्या किंमतीत वाढ, डिझेल 'इतक्या' रुपयांनी महागणार title=
Petrol Diesel Rate Hike in Karnataka

Karnataka Fuel Price Hike : लोकसभा निवडणूक संपताच पेट्रोलच्या किंमती वाढेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. अशातच कर्नाटकातील मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. कर्नाटक सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्याची घोषणा केलीये. त्यामुळे आता सर्वसामान्य लोकांच्या खिशाला कात्री लागणार आहे. कर्नाटक सरकारने पेट्रोलच्या दरात 3 आणि डिझेलच्या दरात सुमारे 3.05 रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

काँग्रेस सरकारने पेट्रोलच्या विक्री करामध्ये 29.84 टक्के, तर डिझेलच्या विक्रीकरात 18.44 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनने दरवाढ करण्याचा निर्णय जाहीर केलाय. कर्नाटकात तत्काळ प्रभावाने पेट्रोलच्या दरात सुमारे 3 रुपयांनी तर डिझेलच्या दरात 3.05 रुपयांनी वाढ होणार आहे. सरकारच्या निर्णयामुळे आता सर्वसामान्य लोकांवरचा भार वाढणार आहे.

महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलची किंमत किती?

मुंबईत पेट्रोल 104.21 रुपये प्रति लिटर विकले जात आहे तर डिझेल 92.15  रुपये प्रति लिटर विकले जात आहे. तर पुण्यात पेट्रोलची किंमत 103.93 रुपये तर डिझेलची किंमत 90.46  रुपये आहे. तर दिल्लीत पेट्रोलची किंमत 94.72 रुपये प्रति लितर आहे तर डिझेल 78.62  रुपयांना विकले जात आहे.

दरम्यान, सरकार ऑइल मार्केटिंग कंपनी रोज पेट्रोल-डिझेलच्या किमतीचे समीक्षण करून सकाळी सहा वाजता नव्या किंमती जाहीर करतात. या किंमती जागतिक पातळीवर घडणाऱ्या काही घडामोडींवरून ठरतात. कच्च्या तेलाच्या किंमती, इंधनाची मागणी, डॉलरचा दर आणि इतर घटकांचा यात समावेश असतो.