आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात वाढ; देशात मात्र पेट्रोल डिझेलच्या किमती स्थिर

Petrol Diesel Price : भारतीय तेल कंपन्या दररोज सकाळी 6 वाजता इंधनाचे दर जाहीर करतात. आज म्हणजेच 22 जुलैचा दर देखील भारतीय तेल कंपन्यांनी जाहीर केला आहे. IOCL च्या म्हणण्यानुसार, आजही इंधनाच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही.

आकाश नेटके | Updated: Jul 22, 2023, 08:52 AM IST
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात वाढ; देशात मात्र पेट्रोल डिझेलच्या किमती स्थिर title=
(फोटो सौजन्य - PTI)

Petrol Diesel Price 22 July 2023: आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूड ऑईलच्या (crude oil) किमतीत वाढीनंतर तेल कंपन्यांनी आज देशभरातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमती (Petrol Diesel Price) जाहीर केल्या आहेत. शुक्रवारी जागतिक बाजारात कच्च्या तेलाचा दर 1.19 टक्क्यांनी वाढून 80.59 डॉलर प्रति बॅरल झाला होता, त्या पार्श्वभूमीवर आज तेलाच्या किमतीत सुधारणा करण्यात आली आहे. सरकारी पेट्रोलियम कंपन्यांनी आज सकाळी 6 वाजता पेट्रोल-डिझेलचे दर नेहमीप्रमाणे जाहीर केले आहेत. अनेक राज्यांमध्ये पेट्रोल 100 रुपयांच्या वर विकले जात आहे. दरम्यान, इंधनाच्या किमती एका वर्षाहून अधिक काळ स्थिर आहेत. पण राज्यस्तरीय करांमुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किमती शहरानुसार बदलत आहेत.

देशाची राजधानी दिल्लीत एक लिटर पेट्रोलची किंमत 96.72 रुपये आहे. तर डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लीटर दराने विकले जात आहे. चेन्नईमध्ये पेट्रोलचे दर प्रतिलिटर 102.63 रुपये आणि डिझेलचे दर 94.24 रुपये प्रति लिटरवर स्थिर आहेत. तर कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. पोर्ट ब्लेअरमध्ये सर्वात स्वस्त पेट्रोल आणि डिझेल विकले जात आहे. जिथे पेट्रोलचा दर 84.10 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर 79.74 रुपये प्रति लिटर आहे.

दरम्यान, देशात आज पुन्हा एकदा तेलाच्या किमती स्थिर ठेवण्यात आल्या आहेत. कच्च्या तेलाची किंमत वाढली तरी जनतेच्या खिशाला काहीच फरक पडणार नाही असेच दिसते आहे. गेल्या वर्षी मे 2022 पासून राष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाची किंमत स्थिर आहेत.

16 राज्यांमध्ये पेट्रोल 100 च्या पार

देशातील 16 राज्यांमध्ये पेट्रोल 100 रुपयांच्या वर आहे. मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, बिहार, महाराष्ट्र, कर्नाटक, मणिपूर, तेलंगणा, पंजाब, झारखंड, सिक्कीम, ओडिशा, केरळ, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, छत्तीसगड आणि राजस्थानमधील सर्व जिल्ह्यांमध्ये पेट्रोल 100 रुपयांच्या वर विकले जात आहे. तर ओडिशा, राजस्थान आणि मध्य प्रदेशातही डिझेल 100 रुपयांच्या वर आहे.