प्रियांका गांधीच्या भूमिकेविषयी राहुल गांधींचा मोठा खुलासा

राम मंदिराविषयी म्हणाले.... 

Updated: Feb 5, 2019, 10:19 AM IST
प्रियांका गांधीच्या भूमिकेविषयी राहुल गांधींचा मोठा खुलासा title=

नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेतेमंडळी पक्ष बळकट करत जनतेवर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करत असतानाच काँग्रेसकडून एक महत्त्वाची खेळी करण्यात आली. प्रियांका गांधी यांनी अखेर सक्रिय राजकारणात प्रवेश करत काँग्रेसच्या महासचिवपदाची धुरा सांभाळली आणि राजकीय चर्चांना वेगळीच कलाटणी मिळाली. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी 'हिंदुस्तान टाईम्स'ला दिलेल्या मुलाखतीत प्रियांका यांची भूमिका नेमकी काय असणार आहे, याचा अखेर खुलासा केला असून, भाजपमध्ये असणारी दुफळी, देशात राजकारणाविषयी असणारं एकंदर वातावरण आणि राम मंदिराच्या मुद्द्यावर आपले विचार मांडले. 

काँग्रेसच्या महासचिव म्हणून प्रियांका गांधी यांची भूमिका फक्त उत्तर प्रदेशपूरतीच मर्यादित नसून, राष्ट्रीय पातळीवरही त्या अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका निभावणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. आपण प्रियांकाला एक काम दिलं असून आता त्या कामाच्या यशावरच पुढील कामं (जबाबदारी) देणार असल्याचंही त्यांनी या मुलाखतीत सांगितलं. 

उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसची स्थिती आणखी क्कम करण्यावर आपला भर असल्याचं सांगत, महायुतीविषयीसुद्धा त्यांनी लक्षवेधी वक्तव्य केलं. सपा- बसपाच्या महायुतीमध्ये स्थान न मिळण्यविषयी प्रतिक्रिया देत काँग्रेस नेहमीच सपा आणि बसपासोबत काम करेल कारण बऱ्याच मुद्द्यावर वैचारिक तडजोड करण्यात आली आहे. शिवाय उत्तर प्रदेशात काँग्रेसच्या विचारसरणीला पुढे नेण्याचा हक्क आपण बजावत राहू, असंही ते म्हणाले. 

राम मंदिराच्या देशव्यापी मुद्द्याविषयी प्रश्न विचारला असता यावर आपण विचार मांडणं किंवा प्रतिक्रिया देणं हे चुकीचं ठरेल ही बाब त्यांनी अधोरेखित केली. 'या विषयावर मी काहीही प्रतिक्रिया देणं चुकीचं ठरेल. कारण, यावर सर्वोच्च न्यायालयच निर्णय देणार आहे. तो निर्णय काहीही असला तरीही काँग्रेस आणि देशातील जनतेलाही त्याचा स्वीकार करेल', असं ते म्हणाले. 

महायुती आणि विरोधी पक्षांच्या भूमिकेला संक्षिप्तपणे मांडत विरोधी पक्षांचं तीन मुद्द्यावर एकमत असल्याचं त्यांनी सांगितलं. पहिला मुद्दा म्हणजे बेरोजगारीचं संकट दूर करणं, दुसरा मुद्दा म्हणजे कृषी क्षेत्रातील अडचणी दूर करणं आणि तिसरा मुद्दा म्हणजे मोदी आणि आरएसएस अर्थात संघाला भारतीय संस्थांचं खच्चीकरण करण्यापासून रोखणं. इंग्रजांप्रमाणेच मोदींनी स्वत:ला देवत्व बहाल केलं आहे, असं म्हणत मोदींच्या भूमिकेवर अनेकांनी नाराजी असल्याची बाब त्यांनी लक्षात आणून दिली.  राहुल गांधी यांनी प्रियांका गांधींच्या राजकीय भूमिकेवरुन पडदा उचलल्यामुळे आणि येत्या काळात त्यांच्यावर आणखी जबाबदारी सोपवण्याचं सूचक वक्तव्य केल्यामुळे आता विरोधी पक्षांमध्ये काँग्रेसच्या या भूमिकेचे काय पजसाद उमटणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.