सोशल मीडियावर प्रियांका गांधींविरुद्ध अश्लील टिप्पणी, 'मोदी भक्ता'ला अटक

अटक करण्यात आलेला योगी सूरजनाथ स्वत:ला ट्विटर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा भक्त म्हणवून घेतोय

Updated: Feb 5, 2019, 10:00 AM IST
सोशल मीडियावर प्रियांका गांधींविरुद्ध अश्लील टिप्पणी, 'मोदी भक्ता'ला अटक title=

नवी दिल्ली : काँग्रेसच्या राष्ट्रीय महासचिव प्रियांका गांधी यांच्याविरुद्ध सोशल मीडियावर अश्लील टिप्पणी करणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी अटक केलीय. नुकतंच, राजकारणात सक्रीय झालेल्या सोनिया गांधी यांची मुलगी आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची बहिण प्रियांका गांधी यांच्याविरुद्ध सोशल मीडियावर अनेक आक्षेपार्ह ट्विट दिसत होते. याविरुद्ध काँग्रेसनं सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. बिहारच्या कटिहार भागातून योगी सूरजनाथ नावाच्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केलीय. हा व्यक्ती स्वत:ला ट्विटर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा भक्त म्हणवून घेतोय. परंतु, योगी सूरजनाथच्या अटकेनंतर मात्र बिहार भाजप अध्यक्ष मनोर राय यांनी मात्र त्याचा पक्षासोबत कोणताही संबंध नसल्याचं सांगितलंय. 

सामाजिक कार्यकर्ते शाहिन सय्यद यांनी प्रियांका यांच्याबद्दल सूरजनाथ यानं केलेल्या ट्विटची माहिती ई-मेलवरून बिहार सायबर पोलिसांना दिली होती. सूरजनाथनं प्रियांका गांधी यांच्याबद्दल ३० जानेवारी रोजी सोशल मीडियावर अश्लील टिप्पणी केली होती. 

या ट्विटचं लोकेशन धुंडाळून काढत सायबर पोलिसांनी त्याला अटक केलीय. आरोपीला न्यायालयीन कोठडीत धाडण्यात आलंय.

प्रियांका गांधी यांच्यावर 'अपमानजनक आणि अश्लील' टिप्पणी करणाऱ्यांवर कारवाईची मागणी करत सोमवारी महाराष्ट्रातही काँग्रेस कार्यकर्त्यांनी सायबर पोलीस आणि महाराष्ट्र महिला आयोगाशी संपर्क केला होता. 

प्रियांका गांधी वाड्रा यांची नुकतंच पूर्व-उत्तरप्रदेशच्या काँग्रेस जनरल सेक्रेटरी म्हणून नियुक्ती करण्यात आलीय.