दिल्ली : संसदेचं हिवाळी अधिवेशन (Parliament Winter Session) 7 डिसेंबरपासून सुरु सुरु झालं असून 29 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अवमान प्रकरणी खासदार डॉ. अमोल कोल्हे (Dr Amol Kolhe) यांनी शुन्य प्रहरात बोलण्याची मागणी केली. पण दोन ते तीन वाक्य बोलल्यानंतर लगेचच अमोल कोल्हे यांचा माईक बंद करण्यात आला. माईक बंद करण्यात आल्यानंतरही अमोल कोल्हे बोलतच होते. त्यांनी संसदेत शिवरायांचा जयजयकार केला.
संसदेत काय म्हणाले डॉ. अमोल कोल्हे
डॉ. अमोल कोल्हे यांनी संसदेत मराठीत आपलं म्हणणं मांडण्यास सुरुवात केली. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचेच नाही तर संपूर्ण देशाचे आराध्यदैवत आहेत. आमच्या शिवभक्तांसाठी छत्रपती शिवाजी महाराज देव नाहीत, पण देवा पेक्षा कमी नाहीत. पण असं असतानाही महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक वक्तव्य केली जात आहेत असं डॉ. अमोल कोल्हे यांनी सांगितलं. पण आपलं म्हणणं पूर्ण करण्याआधीच डॉ. अमोल कोल्हे यांचा माईक बंद करण्यात आला.
अमोल कोल्हे यांनी व्यक्त केली नाराजी
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल महाराष्ट्रात वारंवार अवमानकारक वक्तव्य केली जात आहेत, त्यासंदर्भात ठोस कायद्याची तरतूद व्हावी, जेणेकरुन कोणाचीही हिम्मत होणार नाही अशी वक्तव्य करण्याची, असं अमोल कोल्हे यांनी म्हटलंय. आपणं म्हणणं मांडण्यासाठी संसदेत वेळ मागितला होता, तो वेळ देण्यातही आला पण अवघ्या दोन ते तीन वाक्यात माईक बंद करण्यात आला. पण अशा प्रकारे माईक जरी बंद केला तरी शिवभक्तांच्या भावना आणि भावनांचा आवाज बंद करता येणार नाही, तो कानठळ्या बसवल्याशिवाय रहाणार नाही. असं डॉ. अमोल कोल्हे यांनी ठणकावलं.
13 डिसेंबरला पुणे बंदची हाक
दरम्यान, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी येत्या 13 डिसेंबरला पुणे बंदची (Pune Band) हाक देण्यात आलीय. महाविकास आघाडीसह (Mahavikas Aghadhi) पुरोगामी विचाराच्या पक्ष आणि संघटनाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. पुण्यात शिवजागर बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं. यात 13 डिसेंबरला पुणे बंदची हाक देण्यात आलीय.
पुणे बंदला मुस्लिम संघटनांचा पाठिंबा
शिवाजी महाराजांच्या सन्मानासाठी मुस्लिम संघटनांनीही पुढाकार घेतला आहे. पुणे बंदला मुस्लीम संघटनांनीही या पाठिंबा दिलाय. पुण्यातील 300 मशीदीमध्ये पुणे बंदसाठी आवाहन करण्यात येणार आहे. जमीयत ए उलेमा हिंद संघटनेनं हा निर्णय घेतलाय. त्याचबरोबर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुस्लिम समाजाबद्दल वक्तव्य केलं होतं. यालाही मुस्लिम समाज उत्तर देणार आहे. मुस्लिम संघटनांचाही मोठ्या प्रमाणात पाठिंबा असणार आहे.