नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमधील संबंध कायम तणावपूर्ण राहिले आहेत. एवढचं नाही आजही हे दोन देश एकमेकांचे पारंपरिक शत्रू म्हणूणच ओळखले जातात. परंतु आता एक उत्तम माणुसकीचा दाखला या दोन देशांमध्ये अनुभवता येणार आहे. गुरूवारी अशी एक घटना घडली ज्याचं प्रत्येकाला कौतुक करावसं वाटेल. जयपूरहून ओमानची राजधानी मस्कटसाठी १५० प्रवाशांना घेऊन विमान निघालं. परंतु अचानक झालेल्या विजांच्या कडकडाटात हे विमान सापडलं.
त्यामुळे हे विमान २ हजार फूट खाली आलं. त्यानंतर परिस्थिती लक्षात घेत वैमानिकाने अलर्ट जारी केलं आणि क्षणाचाही विलंब न करता पाकिस्तानी हवाई वाहतूक नियंत्रण विभागाने सक्रिय होत विमानाला धोक्यातून बाहेर आणलं. त्या विजांच्या कडकडाटामुळे पाकिस्तानात गुरूवारी २० जणांचा मृत्यू झाला होता.
'द न्यूज इंटरनॅशनल'च्या वृत्तानुसार या विमानात १५० प्रवासी होते. विमानाने गुरूवारी कराची क्षेत्रावरून उड्डाण भरलं होतं. तेव्हाच आकाशात अचानक विजांचा कडकडाट सुरू झाला आणि ३६ हजार फूट उंच असलेला विमान थेट ३४ हजार फुटांवर येवून पोहोचला.
परिणामी वैमानिकाला आपत्कालीन प्रोटोकॉल जारी करावा लागला, ज्यामुळे जवळच्या कक्षांमध्ये धोक्याची सूचना मिळाली. त्यानंतर पाकिस्तानी हवाई वाहतूक नियंत्रणेकडून महत्त्वाची भूमिका बजावण्यात आली. जोपर्यंत विमान त्याच्या पूर्वस्थितीत येत नाही तोपर्यंत पाकिस्तानचे हे मदत कार्य सुरू होते.