... त्या दिवशी पाकिस्तानकडून ऍम्राम क्षेपणास्त्रांचा वापर, भारतीय लढाऊ विमानं निशाण्यावर

पाकिस्तानच्या वायुदलाकडून एफ १६ या लढाऊ विमानांच्या सहाय्याने २७ फेब्रुवारीला भारतीय हवाई हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न करण्य़ात आला होता.

Updated: Mar 6, 2019, 11:13 AM IST
... त्या दिवशी पाकिस्तानकडून ऍम्राम क्षेपणास्त्रांचा वापर, भारतीय लढाऊ विमानं निशाण्यावर title=

नवी दिल्ली : पाकिस्तानच्या वायुदलाकडून एफ १६ या लढाऊ विमानांच्या सहाय्याने २७ फेब्रुवारीला भारतीय हवाई हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न करण्य़ात आला होता. यावेळी पाकिस्तानच्या वायुदलाकडून पाठवण्यात आलेल्या या विमानांकडून भारतीय वायुदलाच्या विमानांवर अमेरिकन बानवटीच्या ऍम्राम (एआयएम १२०) या हवेतल्या हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांचा वापर करत हल्ला करण्यात आला होता. हा मारा जवळपास ४०- ५० किमी अंतरावरुन करण्यात आल्याचं वृत्त 'एएनआय' या वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केलं आहे. 

भारताच्या सुखोई एसयू ३० आणि मिग २१ या लढाऊ विमानांना पाकिस्तानच्या एफ १६ बायसन कडून निशाण्यावर घेण्यात आलं होतं. भारताविरोधी कारवाईत एफ १६ चा वापरच केला नव्हता हा पाकिस्तानचा दावा खोटा ठरवण्यासाठी भारतीय सैन्यदलाकडून ज्या भागात पाकिस्तानच्या क्षेपणास्त्रांचा मारा करण्यात आला होता त्याच्या पुराव्यांशी शोधमोहिम सुरू आहे. या भागांमध्ये ऍम्राम काही अवशेष पडल्याची शक्यता असल्यामुळेच ही शोधमोहिम सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

पाकच्या एफ १६ मधून भारताच्या सुखोई आणि मिगवर चार ते पाच क्षेपणास्त्रांचा मारा दृष्टीक्षेपात असणाऱ्या अंतरावरुन करण्यात आला होता. २७ फेब्रुवारीला ही कारवाई करण्यात आली होती, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. पाकिस्तानकडून करण्यात येणारे दावे पाहता आता ऍम्रामचे पुरावे शोधण्याला अधिक वेग आला असून, पुन्हा शेजारी राष्ट्राचं पितळ उघडं पडणार असल्याचीच चिन्हं आहेत. दरम्यान, इथे मुख्य बाब ही आहे, की चार- पाच वेळा भारतीय लढाऊ विमानांवर निशाणा साधणाऱ्या पाकिस्तानच्या वायुदलाला अचूक नेम साधण्यात मात्र काही प्रमाणात अपयशच आलं. 

भारताच्या एका मिग २१ ला निशाणा करत, त्यानंतर पाकिस्तानने त्या वायुदलातील विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांना ताब्यात घेतलं होतं. पण, आंतरराष्ट्रीय पातळीवर वाढता दबाव आणि भारताच्या राजकीय धोरणांच्या बळावर पाकिस्तानने अवघ्या काही तासांमध्येच त्यांची सुटका केली होती. 

पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाकव्याप्त काश्मीरमधील बालाकोट परिसरात भारतीय वायुदलाने एअर स्ट्राईक केल्यानंतर पाकिस्तानकडून भारताची हवाई हद्द ओलांडण्यात आली होती. राजौरी आणि नौशेरा भागात हे ऑपरेशन सुरु होतं. ज्यात पाककडून भारतीय सैन्यदलाच्या ब्रिगेड आणि बटालियन मुख्यालयांना निशाण्यावर ठेवण्यात आलं होतं. 

पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या घुसखोरीत एफ १६चाच वापर झाल्याचे पुरावे २८ फेब्रुवारीलाच भारतातर्फे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत सादर करण्यात आले. ज्यामध्ये ऍम्रामचे अवशेष माध्यमांसमोर दाखवण्यात आले. याहून अधिक अवशेष दाखवल्यास पाकिस्तान अडचणीत येऊ शकतो, असंही भारताकडून सांगण्यात आलं आहे.