सवलतीच्या दरात सोनं खरेदीची संधी, ऑफर केवळ १२ जूनपर्यंत

या सरकारी स्कीममुळे सोन्याच्या किंमतीत वाढ झाल्यास त्याचा फायदा मिळतो. 

Updated: Jun 8, 2020, 12:43 PM IST
सवलतीच्या दरात सोनं खरेदीची संधी, ऑफर केवळ १२ जूनपर्यंत title=

नवी दिल्ली : भारतीय रिझर्व बॅंक (RBI) ने गेल्या शुक्रवारी सॉवरेन गोल्ड बॉन्डच्या पुढच्या सिरिजबद्दल माहिती दिली होती. आरबीआयने यासाठी ४ हजार ६७७ प्रति ग्राम इतका दर निश्चित केला. सॉवरेन गोल्ड बॉन्ड स्कीम २०२०-२१ सिरीज III आजपासून खुली करण्यात आली आहे. या स्कीम अंतर्गत १२ जूनपर्यंत सोनं खरेदीची संधी मिळणार आहे. गुंतवणूकदारांना सप्टेंबरपर्यंत ६ वेळा गुंतवणूक करण्याची संधी मिळेल. त्यामुळे याचा फायदा सोनं खरेदीचा फायदा घेता येऊ शकतो. 

नोव्हेंबर २०१५ ला याची सुरुवात झाली. सोन खरेदी करण्याऐवजी जर गोल्ड बॉण्डमध्ये गुंतवणूक केली तर तुमचा टॅक्स वाचू शकतो. यामध्ये ऑनलाईन अर्ज आणि पेमेंट करणाऱ्या गुंतवणूकदारांना प्रति ग्रॅम ५० रुपयांची सवलत मिळेल. अशा गुंतवणूकदारांना सोनं खरेदीसाठी ४ हजार ६२७ रुपये द्यावे लागतील. 

कोणतीही व्यक्ती एका आर्थिक वर्षात कमीत कमी १ ग्राम आणि जास्तीत जास्त ४ किलोग्राम पर्यंतचे सोने खरेदी करु शकते. ट्रस्टसाठी ही मर्यादा २० किलोग्राम इतकी आहे. 

गोल्ड बॉण्ड ऑनलाईन खरेदी करता येऊ शकतात. बॅंक, स्टॉक होल्डींग कॉर्पोरेशन ऑफ इंडीया लिमिटेड, निवडक पोस्ट ऑफीस आणि NSE, BSE सारख्या स्टॉक एक्स्चेंजमधून देखील खरेदी करु शकता.

याची चौथी सिरिज ६ जुलै ते १० जुलैपर्यंत, पाचवी सिरिज ३ ते ७ ऑगस्ट तर सहावी सिरिज ३१ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरपर्यंत असणार आहे. 

या सरकारी स्कीममुळे सोन्याच्या किंमतीत वाढ झाल्यास त्याचा फायदा मिळतो. यावर २.५ टक्के व्याज मिळते. हे व्याज गुंतवणूकदाराच्या खात्यात दर ६ महिन्याला जमा केले जाते. अंतिम व्याज हे मुळ रक्कमेसोबत गुंतवणूक कालावधी संपल्यावर मिळते. ८ वर्षे इतका गुंतवणूक कालावधी आहे. पण ५ वर्षे, ६ वर्षे आणि ७ वर्षे हे पर्याय देखील आहेत. जर बाजारात सोन्याची किंमत घसरली तर नुकसान देखील सहन करावे लागते.