Oil Tanker Capsizes: पृथ्वीवरील बहुतांश भाग व्यापलेला महासगर आणि अथांग समुद्रांमध्ये अनेक जहाजं विहार करत असतात. तेलवाहू, मालवाहू अशा विविध वर्गांमध्ये या जहाजांची कामं सुरू असतात. या महाकाय जहाजांवर काम करणाऱ्यांची संख्यासुद्धा मोठी असते. देशोदेशीचे अनेक कर्मचारी या क्षेत्रात म्हणजेच मर्चंट नेव्हीमध्ये करिअर करत या जहाजांवर महिनोनमहिने व्यतीत करतात. असंच एक मोठं जहाज नुकतंच एका दुर्घटनेचा शिकार झाल्यामुळं सध्या या क्षेत्रात भीतीची लाट पसरली आहे.
ओमानच्या किनाऱ्यानजीक बुडालेल्या कोमोरोस ध्वजाच्या तेलवाहूजहाजावरून 16 जण बेपत्ता असल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. अद्यापही या 16 नाविकांचा शोध लागला नसल्यानं आता यंत्रणा आणि प्रशासनाच्या चिंतेत भर पडताना दिसत आहे. जहाज दुर्घटनाग्रस्त झाल्याच्या एक दिवसानंतर ही माहिती ओमानमधील सागरी सुरक्षा केंद्रापर्यंत पोहोचली. ओमानी केंद्रावरून सोशल मीडियाच्या माध्यमातून देण्यात आलेल्या माहितीनुसार 'प्रेस्टीज फाल्कन' जहाजाच्या चालक दलातील बेपत्ता सदस्यांमध्ये 13 भारतीय नागरिक आणि 3 श्रीलंकन नागरिकांचा समावेश आहे.
LSEG च्या शिपिंग डेटामुळं मिळालेल्या माहितीनुसार हे तेलवाहू जहाज यमनच्या अदन बंदराच्या दिशेनं पुढे जात होतं पण, त्याआधीच ते ओमानच्या दुकम या प्रमुख बंदरानजीक उलटलं. शिपिंग डेटावर नमूद करण्यात आलेल्या माहितीनुसार 2007 मध्ये तयार करण्यात आलेलं हे जहाज साधारण 117 मीटर लांबीचं एक ऑईल प्रोडक्ट टँकर आहे. अशा जहाजांचा वापर कमी अंतरांच्या तटीय दौऱ्यांसाठी केला जातो.
रॉयटर्सच्या वृत्तानुसार हे जहाज अद्यापही समुद्रात बुडालं असून, ते उपडं पडलं आहे. असं असलं तरीही जहाज स्थिर आहे की नाही, त्यातून तेल गळती होतेय की नाही यासंदर्भातील माहिती मात्र अद्याप समोर येऊ शकलेली नाही. दरम्यान, जहाजाविषयीची माहिती मिळताच तातडीनं बचाव पथकानं घटनास्थळी धाव घेत तिथं शोधमोहिम आणि बचावमोहिम हाती घेतली. पण, त्यासंदर्भात अद्यापही कोणतीच अधिकृत माहिती समोर येऊ शकलेली नाही.