Odisha Accident: मृतांच्या रांगेत झोपलेला 'तो' अचानक जागा झाला; कर्मचाऱ्याचा पाय पकडला अन् म्हणाला "मी जिवंत..."

Odisha Train Accident: कोरोमंडल एक्स्प्रेस (Coromandel Express) दुर्घटनेत मृत्यू झाल्याचं समजत मृतांच्या रांगेत ठेवलेला 35 वर्षीय रॉबिन याने बचावपथकातील कर्मचाऱ्याचा पाय पकडला आणि आपण जिवंत असल्याचं सांगितलं. यानंतर सर्वांनाच धक्का बसला. त्याला तात्काळ तेथून बाहेर काढत रुग्णालयात दाखल करण्यात आलं.   

शिवराज यादव | Updated: Jun 6, 2023, 07:46 PM IST
Odisha Accident: मृतांच्या रांगेत झोपलेला 'तो' अचानक जागा झाला; कर्मचाऱ्याचा पाय पकडला अन् म्हणाला "मी जिवंत..." title=

Odisha Train Accident: ओडिशामध्ये (Odisha) तीन ट्रेनमध्ये धडक होऊन झालेल्या भीषण अपघातानंतर मृतदेहांची अक्षरश: रांग लागली होती. 35 वर्षीय रॉबिन हादेखील कोरोमंडल एक्स्प्रेसमधून (Coromandel Express) प्रवास करत होता. बचावकार्यादरम्यान अपघातात जखमी झालेल्या रॉबिनचा मृत्यू झाल्याचं समजत त्यालाही मृतदेहांच्या रांगेत ठेवण्यात आलं होतं. दुर्घटना झालेल्या ठिकाणीच रॉबीन शेकडो मृतदेहांच्या बाजूला होता. पण आश्चर्यकारकपणे रॉबीन बचावला होता. 

दुर्घटनेत मृत्यू झालेल्या सर्वांचे मतदेह एका शाळेत ठेवण्यात आले होते. या शाळेत मृतदेहांचा ढीग लागला होता. मृतदेह हटवण्यासाठी बचाव पथकातील कर्मचारी शाळेच्या खोलीत पोहोचले होते. यावेळी एक कर्मचारी मृतदेहांच्या शेजारुन चालत असताना त्याला कोणीतरी आपला पाय खेचत असल्याचं जाणवलं. यावेळी त्याला आवाज ऐकू आला. ती व्यक्ती पाणी मागत होती. "मी जिवंत आहे, मेलेलो नाही. मला कोणीतरी कृपया पाणी द्या," असं तो म्हणत होता. 

सुरुवातीला कर्मचाऱ्याला धक्काच बसला. त्याला आपल्याला भास होत आहे असं वाटलं. पण नंतर त्याने सर्व हिंमत एकटवली आणि पाहिलं तर 35 वर्षीय रॉबीन जिवंत होता आणि जीव वाचवावा यासाठी विनंती करत धडपडत होता. यानंतर बचावपथकातील कर्मचाऱ्यांना त्याला घेऊन तात्काळ रुग्णालयाच्या दिशेने धाव घेतली. 

रॉबीन हा पश्चिम बंगालचा रहिवासी असून अपघातात त्याने आपले दोन्ही पाय गमावले आहेत. पण सुदैवाने आणि आश्चर्यकारकपणे तो यातून बचावला आहे. दरम्यान, रेल्वेने मंगळवारी आणखी तिघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर मृतांचा आकडा 278 झाल्याची माहिती दिली आहे. 

रॉबीन गावातील इतर सात जणांसोबत कोरोमंडल एक्स्प्रेसने प्रवास करत होता. कामाच्या शोधात तो हावडा ते आंध्र प्रदेश असा प्रवास करत होता. दरम्यान, गेल्या दोन दशकातील सर्वात भीषण दुर्घटनेत त्याने आपले दोन्ही पाय गमावले आहेत. त्याची प्रकृती सध्या गंभीर आहे. रॉबिन नैया याच्यावर मेदिनीपूर मेडिकल कॉलेज हॉस्पिटलच्या ऑर्थोपेडिक वॉर्डमध्ये उपचार सुरू आहेत.

"माझा पुतण्या रॉबीन स्थलांतरित मजूर म्हणून काम करण्यासाठी आंध्रला जात होता. ट्रेन दुर्घटनाग्रस्त झाल्यानंतर तो बेशुद्ध झाला. मृतदेहांच्या ढिगाऱ्यात आपण असल्याचं त्याने पाहिलं. बचावकर्त्याचा एक पाय धरत त्याने पाणी मागितलं असता त्याचा शोध लागला. यानंतर त्याने पाण्याची मागणी केली आणि आपला जीव वाचवा अशी विनंती केली. कर्मचाऱ्यांनी यानंतर त्याला रुग्णालयात दाखल केलं,” अशी माहिती  रॉबीनचे काका मानवेंद्र सरदार यांनी दिली आहे. पण रॉबिनचे इतर सर्व सहा मित्र अद्याप बेपत्ता आहेत. 

विशेष म्हणजे रॉबीनच्या कुटुंबात रेल्वे अपघातात मृत्यूला चकवा देणारा तो पहिलाच नाही. 2010 मध्ये जननेश्वरी एक्स्प्रेस दुर्घटनेत 148 प्रवाशांचा मृत्यू झाला होता. मानवेंद्र सरदार यांनी या या ट्रेनमध्ये आपला मोठा भाऊ प्रवास करत होता अशी माहिती दिली आहे. "मृत्यू झाल्याचं समजत माझ्या भावाला बचाव पथकातील कर्मचाऱ्यांनी बाजूला नेलं होतं. पण त्याने तिथून पळ काढत दुसऱ्याच्या मोबाइलवरुन फोन केला होता," अशी आठवण त्यांनी सांगितली. 

ओडिशामधील दुर्घटनेत 278 लोकांचा मृत्यू झाला असून, 1100 जण जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा मोठा असून अनेकडण अद्याप आपल्या नातेवाईकांचा शोध घेत आहेत. अद्याप 101 मृतदेहांची ओळख अद्याप पटलेली नाही.