Odisha Accident: दुर्घटनेच्या काही सेकंद आधी नेमकं काय झालं होतं? कोरोमंडल एक्स्प्रेसच्या पायलटने केला खुलासा

Odisha Accident: ओडिशामधील बालासोर येथे कोरोमंडल एक्स्प्रेसचा भीषण अपघात झाल्याने रेल्वेच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. दरम्यान, या एक्स्प्रेसचे लोको पायलट आणि गार्ड्स मात्र या अपघातातून बचावले आहेत. दुर्घटनेच्या आधी नेमकं काय झालं होतं याचा खुलासा त्यांनी नुकताच केला आहे.   

शिवराज यादव | Updated: Jun 6, 2023, 12:01 PM IST
Odisha Accident: दुर्घटनेच्या काही सेकंद आधी नेमकं काय झालं होतं? कोरोमंडल एक्स्प्रेसच्या पायलटने केला खुलासा title=

Odisha Accident: ओडिशामधील (Odisha) बालासोर (Balsore) येथे झालेल्या भीषण दुर्घटनेच्या तीन दिवसांनी कोरोमंडल एक्स्प्रेसचे (Coromandel Express) चालक आणि गार्ड या अपघातातून बचावले असल्याची माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेत ते जखमी झाले असून त्यांना बालासोर जिल्ह्यातील वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान त्यांनी पहिल्यांदाच दुर्घटनेच्या काही सेकंद आधी नेमकं काय झालं होतं याचा खुलासा केला आहे. 

रेल्वे बोर्डाने कोरोमंडल एक्स्प्रेसच्या लोको पायलट्सना क्लीन चीट दिली आहे. इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग सिस्टममध्ये बदल झाल्याने ही दुर्घटना घडली. प्राथमिक माहितीनुसार, ट्रेनने वेगमर्यादा ओलांडलेली नव्हती. ट्रेनला मुख्य मार्गावर जाण्याचा सिग्नल मिळाला, परंतु तो कसा तरी लूप लाइनमध्ये प्रवेश केला ज्यावर एक मालगाडी उभी होती. कोरोमंडल एक्स्प्रेसच्या चालकाने आपल्याला हिरवा सिग्नल दिसल्यानेच एक्स्प्रेस त्या मार्गावर टाकली अशी माहिती दिली आहे. 

कोरोमंडल एक्स्प्रेसचे या अपघातात सर्वाधिक नुकसान झाले असल्याची माहिती रेल्वे बोर्ड सदस्य जया वर्मा सिन्हा यांनी दिली आहे. "आम्ही कोरोमंडल एक्स्प्रेसच्या चालकाशी संवाद साधला. ज्यावेळी त्याला हिरवा सिग्नल देण्यात आला होता तेव्हा तो पूर्णपणे शुद्धीवर आणि सतर्क होता," अशी माहिती जया सिन्हा यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली. 

दरम्यान लगतच्या अप लाइनवर धावणाऱ्या हावडा यशतवंतपूर एक्स्प्रेसच्या (Howrah Yesvantpur Express) चालकाने दुर्घटनेआधी आपण एक अनपेक्षित असा आवाज ऐकला होता असा दावा केला आहे. "हावडा यशतवंतपूर एक्स्प्रेसमधील A1 कोचमधील टीटीशीही आम्ही संपर्क साधला. त्याने आम्हाला मागून एक मोठा आवाज ऐकू आल्याचं सांगितलं. काहीतरी मोठा अडथळा आला असावा असं त्याला वाटलं," अशी माहिती जया सिन्हा यांनी दिली आहे.

कोरोमंडल एक्स्प्रेसने लूप ट्रॅकमध्ये प्रवेश केल्यानंतर थांबलेल्या मालगाडीला धडक दिली. त्यानंतर रुळावरून घसरलेले डबे विरुद्ध दिशेने जाणारी दुसरी प्रवासी ट्रेन हावडा यशवंतपूर एक्स्प्रेसच्या दोन मागच्या डब्यांवर आदळले.

कोरोमंडल एक्स्प्रेसच्या जखमी क्रू मेम्बर्सना वैद्यकीय उपचार दिले जात आहेत. दरम्यान इंटरलॉकिंग यंत्रणेत अचानक बदल होण्याचं कारण शोधण्यासाठी रेल्वे प्रशासनाने चौकशी सुरु केली आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी रविवारी सांगितलं की, ट्रॅकच्या "कॉन्फिगरेशन" मध्ये बदल केल्यामुळे कोरोमंडल एक्सप्रेस मालगाडीला मागून धडकली, ज्यामुळे ओडिशामध्ये तीन मार्गांवर रेल्वे दुर्घटना झाली. या दुर्घटनेत 275 लोक ठार झाले सून 1,100 हून अधिक जखमी झाले आहेत.