'पश्चिम बंगालमध्ये भाजपची सत्ता येईल तेव्हा तृणमूलच्या गुंडांची गळ्यात पट्टा घालून धिंड काढू'

अखेर योगी आदित्यनाथ रस्ते मार्गाने पश्चिम बंगालमध्ये दाखल

Updated: Feb 5, 2019, 05:51 PM IST
'पश्चिम बंगालमध्ये भाजपची सत्ता येईल तेव्हा तृणमूलच्या गुंडांची गळ्यात पट्टा घालून धिंड काढू' title=

कोलकाता: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मंगळवारी दुपारी रस्ते मार्गाने पश्चिम बंगालमध्ये पोहोचले. योगी आदित्यनाथ यांची रविवारी कोलकातामध्ये जाहीर सभा होती. पण पोलिसांनी त्यांचे हेलिकॉप्टरच उतरू न दिल्यामुळे अखेर त्यांनी फोनवरूनच प्रचारसभेला संबोधित केले होते. यानंतर योगी आदित्यानाथ आज रस्त्यावरून प्रवास करत पश्चिम बंगालच्या पुरुलियामध्ये दाखल झाले. याठिकाणी झालेल्या जाहीर सभेत योगींनी ममता बॅनर्जी यांच्यावर सडकून टीका केली. त्यांनी म्हटले की, आपल्याकडे लोकशाही असताना एखाद्या मुख्यमंत्र्याने धरणे आंदोलन करणे अत्यंत लज्जास्पद म्हणावे लागेल. ममता बॅनर्जी राज्यात मनमानी करत आहेत. पश्चिम बंगालमध्ये भाजपची सत्ता येईल त्यादिवशी तृणमूल काँग्रेसच्या गुंडांना गळ्यात पट्टा घालून आम्ही त्यांची धिंड काढू, असे वक्तव्य योगी आदित्यनाथ यांनी केले. 

ममता बॅनर्जी या भ्रष्टाचाऱ्यांना वाचविण्यासाठी काम करत आहेत. त्यामुळे चौकशीत सहकार्य करण्याची वेळ आली तेव्हा त्या धरणे आंदोलनासाठी बसल्या. यापूर्वी त्यांनी राज्यात दूर्गा पूजा करण्याच्या उत्सवावरही बंदी घातली होती. ममता बॅनर्जी यांनी या सगळ्या प्रश्नांची उत्तरे द्यायला पाहिजेत. भाजपशासित राज्यांमध्ये कोणत्याही उत्सवावर बंदी नाही. त्यामुळे नागरिकांना दूर्गापूजा, शिवरात्री आणि जन्माष्टमी असे सर्व सण साजरे करता येतात. मात्र, पश्चिम बंगालमध्ये अनेक गोष्टी चुकत असल्याचे यावेळी योगींनी सांगितले. 

शारदा चिटफंड घोटाळ्याप्रकरणी तपासासाठी सीबीआयचे पथक रविवारी कोलकातामध्ये दाखल झाले. त्यानंतर राजीव कुमार यांच्या निवासस्थानी छापा टाकण्यासाठी गेलेल्या पथकाला पश्चिम बंगालमधील पोलिसांनीच ताब्यात घेतले. राजीव कुमार यांच्या निवासस्थानी प्रवेश करण्यास त्यांना नकार देण्यात आला. रात्री उशीरापर्यंत त्यांना पोलिसांनी आपल्या ताब्यात ठेवले होते. त्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले. या प्रकरणी मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. तेव्हा न्यायालयाने पोलीस आयुक्त  राजीव कुमार यांनी सीबीआयसमोर चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले. मात्र, ही चौकशी मेघालयची राजधानी शिलांग येथे होईल. हा निर्णय लोकशाहीचा विजय असल्याची प्रतिक्रिया ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केली.