बंगळुरु: माझ्या पाठीत भाजपने नव्हे तर बंडखोर आमदारांनी खंजीर खुपसला, अशी खंत काँग्रेस नेते डी. शिवकुमार यांनी व्यक्त केली. ते मंगळवारी कर्नाटकच्या विधानसभेत बोलत होते. यावेळी त्यांनी बंडखोरी केलेल्या काँग्रेस आणि सेक्युलर जनता दलाच्या (जेडीएस) आमदारांवर टीकास्त्र सोडले.
डी. शिवकुमार यांनी म्हटले की, माझा घात भाजपने नव्हे तर मुंबईत असलेल्या बंडखोर आमदारांनी केला. मात्र, त्याची चिंता करण्याची गरज नाही. एक दिवस ते तुमचाही घात करतील. कोणत्याही परिस्थितीत त्यांना मंत्रीपद मिळणार नाही, याची शाश्वती मी देतो.
या बंडखोरांनी भाजपच्या नेत्यांची दिशाभूल केली आहे. मी मुंबईत या बंडखोर आमदारांशी बोलायला गेलो होतो. यापैकी एका आमदाराशी माझे बोलणे झाले होते. त्याने इकडे येऊन, मला घेऊन जा, असे म्हटले होते.
कुमारस्वामी विश्वासदर्शक ठरावाला तयार, बंडखोरांना हवीय ४ आठवड्यांची मुदत
काँग्रेसचे बंडखोर आमदार एमटीबी नागराज यांनाही माझ्यामुळेच पक्षाने तिकीट दिले होते. आम्ही त्यांच्याशी संपर्क साधून चर्चाही केली. यानंतर आम्ही त्यांना डांबून ठेवू शकलो नसतो का? मात्र, आम्हाला तसे करायचे नव्हते, कारण आमचा त्यांच्यावर विश्वास आहे. त्यांना विधानसभेत आणून सरकारविरोधात मतदान करू द्या, असे डी. शिवकुमार यांनी सांगितले.