वादग्रस्त इस्लामी धर्मप्रचारक झाकीर नाईक याने बुधवारी भारतात परतण्यासंबंधीचे वृत्त फेटाळून लावले. मी भारतात परतणार असल्याचे वृत्त खोटे व निराधार आहे. माझा तसा कोणताही इरादा नाही. माझ्यावर खोटे आरोप लावण्याची भीती दूर होत नाही, तोपर्यंत मी भारतात परतणार नाही. भारतीय सरकार माझ्याशी न्याय व योग्य पद्धतीने वागेल, अशी खात्री पटल्यावरच मायदेशी परतेन, असेही झाकीर नाईकने स्पष्ट केले.
गेल्या काही दिवसांपासून प्रसारमाध्यमांकडून झाकीर नाईक भारतात पतरणार असल्याचे सांगण्यात येत होते. मलेशिया सरकार झाकीर नाईकला भारताकडे सोपवणार असल्याचे प्रसारमाध्यमांचे म्हणणे होते. या पार्श्वभूमीवर झाकीर नाईकने निवेदन जारी करून आपली भूमिका स्पष्ट केली.
प्रक्षोभक भाषणे करून समाजात धार्मिक तेढ निर्माण करण्याच्या आरोपाखाली राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) व अंमलबजावणी संचालनालयाने झाकीर नाईकभोवती कारवाईचा फास आवळला होता. भादंवि कलम 153 (अ) व बेकायदा कारवाया प्रतिबंधक कायद्याच्या कलम 10, 13 व 18 अन्वये नाईकविरुद्ध गुन्हे नोंदविले आहेत. ते गंभीर स्वरूपाचे असल्याचे सिद्ध झाल्यास त्याला जन्मठेप होऊ शकते. समन्स काढूनही हजर न झाल्याने त्याला ‘फरार’ घोषित करण्यात आले आहे.