नाना पटोलेंवर कारवाई का नाही? या राज्यात चाललंय तरी काय? देवेंद्र फडणवीस यांचा सवाल

काँग्रेसला आता राजकीय पक्ष म्हणायचं की दहशत पसरवारी संघटना?

Updated: Jan 18, 2022, 04:24 PM IST
नाना पटोलेंवर कारवाई का नाही? या राज्यात चाललंय तरी काय? देवेंद्र फडणवीस यांचा सवाल title=

गोवा : काँग्रेस (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadanvis) केली आहे. केवळ शारिरीक उंची असून चालत नाही, तर वैचारिक-बौद्धीक उंची पण असावी लागते, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. पंजाबमध्ये पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) यांचा ताफा 20 मिनिटं खोळंबून रहातो, काँग्रेसचे मुख्यमंत्री त्याची साधी दखलसुद्धा घेत नाहीत. 

आता महाराष्ट्राचे काँग्रेस अध्यक्ष म्हणतात मी मोदींना मारू शकतो, काँग्रेस पक्षात चाललंय तरी काय? असा सवाल फडणवीस यांनी विचारला आहे. कधीकाळा स्वातंत्र्याच्या आंदोलनात असणारा हा पक्ष इतक्या रसातळला गेला आहे, सत्तेसाठी काहीही, काँग्रेसला आता राजकीय पक्ष म्हणायचं की दहशत पसरवारी संघटना? अशा शब्दात फडणवीस यांनी फटकारलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मारण्याची भाषा ज्यांनी केली, त्यांच्यावर काहीच कारवाई नाही आणि या अराजकतेवर कारवाईची मागणी करणार्‍या भाजपाच्या लोकप्रतिनिधी-कार्यकर्त्यांना जागोजागी ताब्यात घेण्याची कार्यवाही केली जात आहे. 

कायद्याच्या कितीही चिंधड्या उडवा, वाट्टेल तसा पोलिसी दबाव आणा, भाजपाचा कार्यकर्ता मूग गिळून गप्प बसणार नाही आणि या राज्यातील जनताही तुम्हाला माफ करणार नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नीला राबडीदेवी म्हटलं तर त्या व्यक्तीवर कारवाई करण्यात आली. आणि इथे देशाच्या पंतप्रधानांना जीवे मारण्याची भाषा करतात, पण त्यांच्यावर महाराष्ट्रात गुन्हा दाखल होत नाही, हे खूप चुकीचं आहे, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.