नितीश कुमारांना आली सिनेमा पाहण्याची लहर, रिक्षात बसून गाठले थिएटर; मूव्हीही ठरला हिट

Nitish Kumar: नव्या सरकारमध्ये नितीश कुमार यांचे महत्व वाढले आहे. 

Pravin Dabholkar | Updated: Jun 7, 2024, 04:11 PM IST
नितीश कुमारांना आली सिनेमा पाहण्याची लहर, रिक्षात बसून गाठले थिएटर; मूव्हीही ठरला हिट  title=
Nitish kumar

Nitish Kumar: पंतप्रधान नरेंद्र मोगी तिसऱ्यांदा केंद्रात सरकार बनवत आहेत. मोदी सरकार 3.0 मध्ये दोघांची महत्वाची भूमिका आहे. पहिले म्हणजे जनता दल यूनायटेडचे नितीश कुमार आणि दुसरे म्हणजे तेलगू देशम पार्टी म्हणजेच टीडीपीचे चंद्राबाबू नायडू... यामध्ये नितीश कुमार हे सध्या देशभरात चर्चेत आहेत. कारण ते कधी आपल्या विधानावरुन पलटतील हे कोणी सांगू शकत नाहीत, असे म्हटले जाते. 

नितीश कुमार यांच्या जनता दल-यू ने या निवडणुकीत 12 जागा जिंकल्या तर टीडीपीने 16 जागा जिंकल्या आहेत. भाजपला स्थिर सरकार चालवण्यासआठी या दोन्ही पक्षांचा आधार घेणे आवश्यक आहे. त्यामुळे नव्या सरकारमध्ये नितीश कुमार यांचे महत्व वाढले आहे. 

राजकीय सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बिहारला विशेष राज्याचा दर्जा द्यावा, 4 खासादारांवर 1 मंत्रिपद अशी अट नितीश कुमार यांनी पंतप्रधान मोदींसमोर ठेवली आहे. येडीयूचे 12 खासदार आहेत. या हिशोबाने त्यांना 3 मंत्रालय हवी आहेत. यातही नितीश कुमार यांना रेल्वे, कृषी आणि अर्थ मंत्रालय हवे आहे. 

 नितीश कुमार यांना राजकारणातील जादुगार म्हटलं जातं. जी गोष्ट ते ठरवतात, ती ते करुन दाखवतात. 2009 चा एक किस्सा सांगितला जातो. त्यावेळी नितीश कुमार यांना 'स्लमडॉग मिलेनियर' सिनेमा बघण्याची लहर आली. सिनेमागृहापर्यंत जाण्यासाठी कोणते साधन उपलब्ध होत नव्हते. अशावेळी ते सायकल रिक्षावर स्वार झाले आणि सिनेमा पाहायला गेले. एवढेच नव्हे नितीश कुमार यांना सिनेमा इतका आवडला की,त्यांनी सर्वांना स्लमडॉग मिलेनियर सिनेमा पाहण्याचे आवाहन केले.  मग काय? नितीश कुमारांच्या एका पावलाने सिनेमा बिहारमध्ये हिट होऊ लागला. 
 
नितीश कुमार यांचा हा सिनेमा पाहण्याचा किस्सा 'नितीश कुमार अंतरंग- मित्रांच्या नजरेतून' या पुस्तकात लिहिण्यात आलाय. नितीश यांचे मित्र उदय कांत यांनी हे पुस्तक लिहिले आहे. 

काय लिहिलंय पुस्तकात?

निवडणूक आयोगाने 2 मार्च 2009 ला 15 व्या लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या. त्यावेळी पटनाच्या कोणत्या तरी सिनेमागृहात 'स्लमडॉग मिलेनियर' सिनेमा लागला होता. या सिनेमाला 8-8 ऑस्कर पुरस्कार मिळाले होते. नितीश कुमारांना हा सिनेमा पाहण्याची लहर आली. निवडणूक तारखा जाहीर झाल्यानंतर आचार संहिता लागू झाली. खासगी कामासाठी सरकारी वाहनाचा उपयोग केला जाऊ शकत नव्हता. नितीश कुमार यांच्याकडे कोणते इतर वाहन नव्हते. 

त्यांनी सिनेमाबद्दल इतकं ऐकलं होतं की आता कधी जाऊन सिनेमा पाहतोय असं त्यांना झालं होतं. 5 मार्च रोजी ते सायकल रिक्षात बसले आणि सिनेमागृहात पोहोचले. सिनेमा बघून परतले तेव्हा खूप खूष होते. त्यांनी जवळच्या मित्रांना सिनेमा बघण्याचा सल्ला दिला. 

रिक्षातून जाऊन सिनेमा पाहणे हा नितीश कुमारांचा स्टंट असल्याची टीका त्यावेळी काही लोकांनी केली. यातून नितीश यांना काय पब्लीसिटी मिळाली माहिती नाही पण स्लमडॉग मिलेनियर सिनेमाला प्रेक्षकांची गर्दी मात्र मिळू लागली. नितीश यांच्या कौतुकानंतर सिनेमाला पंख लागले. जोरदार आपटणार असलेला सिनेमा पटनामध्ये हाऊसफूल्ल होऊ लागला.