जेलच्या भीतीने नितीशकुमार भाजपला शरण - लालू यादव

गरीब, दलित आणि मागास वर्गातील जनतेच्या पाठिंब्याने तेजस्वी मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर विराजमान होतील, अशी भविष्यवाणीही त्यांनी केली. 

Updated: Sep 10, 2017, 08:22 PM IST
जेलच्या भीतीने नितीशकुमार भाजपला शरण - लालू यादव title=

भागलपूर : तुरुंगात जाण्याच्या भीतीने नितीश कुमार भाजपला शरण गेले, असं राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी म्हटले आहे. सृजन घोटाळा प्रकरणात तुरुंगात जाण्याच्या भीतीने मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी महाआघाडी तोडून भाजपला शरण गेले, अशी टीका देखील भागलपूरमधील रॅलीत नितीश कुमार सरकारवर हल्लाबोल करताना लालूंनी केली आहे.

सृजन घोटाळ्याची कुणकुण दिल्लीत भाजपला लागली होती आणि त्यांनी अलिखित असा धमकीवजा संदेश नितीश कुमार यांना दिला होता. या घोटाळ्याप्रकरणी तुरुंगात जावे लागेल, असा हा संदेश होता. याच भीतीने नितीश कुमार भाजपला शरण गेले, असा दावा लालूप्रसाद यांनी केला. 

यावेळी लालूप्रसाद यांनी नितीश कुमार यांच्याविषयी आक्षेपार्ह टिप्पणीही केली. तसेच नितीश कुमार यांना खुर्चीचा मोह सूटत नाही. मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवरच त्यांना प्राण सोडायचे आहेत, अशी घणाघाती टीका लालूंनी केली. 

२० वर्षांपासून खटले लढण्याची मला सवय झाली आहे. मी घाबरलो नाही म्हणून हे लोक माझ्या मुलांच्या मागे लागले आहेत. आमच्याविरोधात सीबीआयचा वापर केला, असा आरोपही त्यांनी केला.

सृजन घोटाळ्याला नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री सुशील मोदी जबाबदार आहेत, असेही लालूप्रसाद म्हणाले. आज नाही तर उद्या तेजस्वी यादव मुख्यमंत्रिपदी विराजमान होतील. नितीश कुमार यांच्या मर्जीने नव्हे तर गरीब, दलित आणि मागास वर्गातील जनतेच्या पाठिंब्याने तेजस्वी मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर विराजमान होतील, अशी भविष्यवाणीही त्यांनी केली.