आचार संहिता लागू होताच सीतारमण यांना सोडावं लागलं विशेष विमान

आचार संहिता लागू होणात सीतारमण यांनी सरकारी गाडीचा वापर टाळला

Updated: Mar 11, 2019, 01:32 PM IST
आचार संहिता लागू होताच सीतारमण यांना सोडावं लागलं विशेष विमान title=

चेन्नई : निवडणूक आयोगाने रविवारी संध्याकाळी लोकसभा निवडणुकीची घोषणा केली. 17 व्या लोकसभेसाठी देशात 7 टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. 11 एप्रिलला पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे. 19 मेला शेवटच्या टप्प्यातील मतदान होणार आहे. त्यानंतर 23 मेला मतमोजणी होणार आहे. निवडणुकीची घोषणा होताच देशभरात आचार संहिता लागू झाली आहे. आचार संहितेच्या नियमांचं काटेकोरपणे पालन होत असल्याचं पहिलं उदाहरण हे निर्मला सीतारमण यांच्या बाबतीत घडलं. निर्मला सीतारमण यांना आपलं विशेष विमान सोडून कमर्शियल विमानाने दिल्लीला यावं लागलं.

सीतारमण या चेन्नईमध्ये एका कार्यक्रमासाठी हजर होत्या. रविवारी या दरम्यान निवडणुकीची घोषणा झाली आणि आचार संहिता लागू झाली. त्यामुळे त्यांनी सरकारी गाडी आणि इस्कॉर्टचा देखील वापर केला नाही. एका भाजप नेत्याच्या गाडीने त्या विमानतळावर पोहोचल्या. संरक्षण मंत्री या एका विशेष विमानाने रवाना होणार होत्या. पण आचार संहिता लागू झाल्याने त्यांना ते विमान वापरता आलं नाही.

भारतीय जनता पक्षाने एक प्रेस नोट जारी करुन माहिती दिली की, सीतारमण या एका खासगी कंपनीच्या विमानाने दिल्लीला येतील. सूत्रांच्या माहितीनुसार सीतारमण यांनी अधिकाऱ्यांना त्यांना सोडण्यासाठी टर्मिनलपर्यंत न येण्याच्या सूचना दिल्या.

काय असते आचार संहिता?

आचार संहिता ही एक गाईडलाईन असते. जी निवडणुकीच्या काळात पाळली जाते. याचं पालन नेत्यांना करावं लागतं. निवडणुकीची घोषणा होताच आचार संहिता लागू होते. संविधानाच्या कलम 324 नुसार निष्पक्ष आणि निर्विवाद निवडणूक पार पडावी म्हणून हा नियम असतो. या दरम्यान कोणताच उमेदवार मतदारांसोबत कोणताही व्यवहार किंवा अनैतिक कार्य़ नाही करु शकत. याबाबत कारवाई करण्याचा अधिकारी निवडणूक आयोगाला असतो.

रविवारी लोकसभा निवणुकीची घोषणा झाली. देशात 7 टप्प्यांमध्ये मतदान पार पडणार आहे. 90 कोटी मतदान आपला हक्क बजावणार आहेत. मुख्य निवडणूक अधिकारी आयुक्त सुनील अरोडा यांनी म्हटलं की, 2018-19 मध्ये नवीन 1.5 कोटी मतदार जोडले गेले आहेत.