हजारो कोटींचा गैरव्यवहार करुन फरार झालेल्या नीरव मोदीचा पत्ता सापडला

नीरव मोदींला भारतात आणण्यासाठी प्रयत्न सुरु

Updated: Dec 30, 2018, 06:57 PM IST
हजारो कोटींचा गैरव्यवहार करुन फरार झालेल्या नीरव मोदीचा पत्ता सापडला title=

नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँकेत हजारो कोटींचा गैरव्यवहार करुन फरार झालेला मुख्य आरोपी नीरव मोदीचा पत्ता सापडलाय. नीरव मोदी इंग्लंडमध्ये वास्तव्याला असल्याची माहिती ब्रिटीश यंत्रणांनी भारत सरकारला दिली आहे. परराष्ट्र राज्यमंत्री व्ही.के.सिंह यांनी राज्यसभेमध्ये ही माहिती दिली. मँचेस्टरच्या नॅशनल सेंट्रल ब्युरोने नीरव मोदी इंग्लंडमध्ये राहत असल्याची माहिती दिली आहे असे व्ही.के.सिंह यांनी सांगितलं. नीरव मोदीचे भारताकडे प्रत्यार्पण करण्यासंदर्भात केंद्र सरकारने ऑगस्ट २०१८ मध्ये ब्रिटन सरकारला विनंतीचे दोन अर्ज पाठवले होते. एक अर्ज सीबीआयच्या तर दुसरा अर्ज अंमलबजावणी संचलानलयाकडून करण्यात आला होता. हे दोन अर्ज ब्रिटन सरकारच्या विचाराधीन असल्याची माहिती सिंह यांनी दिली.

भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाने जून महिन्यात अनेक युरोपियन देशांना पत्र लिहून नीरव मोदीचा ठावठिकाणा शोधून काढण्यासाठी मदत मागितली होती. नीरव मोदी पंजाब नॅशनल बँकेतील ११,३०० कोटीपेक्षा जास्त रक्कमेच्या घोटाळयातील मुख्य आरोपी आहे.

फरार होणाऱ्या गुन्हेगारांना पकडण्याच्या केंद्र सरकारच्या प्रयत्नांना यश येताना दिसत आहे. गेल्या ४ वर्षात पलायन केल्या १६ फरार आरोपींना भारतात आणण्यात आले आहे. २०१८ मध्ये ५ फरार आरोपींना भारतात आणण्यात आले. अगस्ता वेस्टलॅंड (Agusta Westland Case) व्हीव्हीआयपी हॅलीकॉप्टर करार प्रकरणात कथित संशयित बिचौलिया ख्रिश्चियन मिशेलला देखील भारतात आणण्यात आले आहे.

२०१५ मध्ये ६ आरोपी फरार

परराष्ट्र राज्यमंत्री वीके सिंह यांनी लोकसभेत एका प्रश्नाचे उत्तर देताना यासंदर्भात माहिती दिली. गेल्या चारवर्षात २०१५ मध्ये सर्वाधिक ६ फरार आरोपींना भारतात आणण्यात यश आले आहे. या ६ जणांमध्ये युनायटेड लिब्रेशन फ्रंट ऑफ असम (ULFA) चे जनरल सेक्रेटरी अनूप चेतियाला बांगलादेशहून आणले गेले. २०१६ मध्ये चार फरार आरोपी भारतात परत आले. २०१७ मध्ये जॉब स्कॅम रॅकेटमध्ये सहभागी सुल्तान अबूबकर कादिरला सिंगापूरमधून भारतात आणले गेले. 

भारतात १३२ फरार आरोपी 

परदेशातून पळून भारतात आलेल्यांची संख्या ४३ इतकी आहे. तर भारतातर्फे १३२ प्रत्यापर्ण करण्यात आले आहेत. भारताने गेल्या चार वर्षात अफगाणिस्तान, लिथुआनिया, मलावी आणि मोरक्को या चार देशात प्रत्यर्पण करारांवर सह्या केल्या. नीरव मोदीचे प्रत्यर्पण करण्यासाठी भारत लंडनवर दबाव टाकत आहे. भारताने ब्रिटनकडे नीरवला भारतात आणण्यासाठी दोन वेळा मागणी केली आहे.