नवी दिल्ली : राज्यामध्ये महाशिवआघाडीचं सरकार स्थापन करण्याची चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे. आज काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत आम्ही मुंबईतल्या शिवसेना नेत्यांच्याही संपर्कात होतो, असं वक्तव्य काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं आहे.
आमची चर्चा सकारत्मक झाली आहे आणि लवकरच राज्यात स्थिर सरकार येईल, असा विश्वास पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला आहे. उद्या पहिले काँग्रेस आणि राष्ट्रवादीची वेगळी बैठक होईल, यानंतर पुन्हा दोन्ही पक्ष एकत्र बैठक घेतील आणि मुंबईला रवाना होतील. शुक्रवारी मुंबईमध्ये तिन्ही पक्षांच्या नेत्यांची एकत्र बैठक होईल. शुक्रवार संध्याकाळी पत्रकार परिषदेमध्ये फॉर्म्युला कळेल, अशी माहिती पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे.
काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची संध्याकाळी ५.३० च्या सुमारास सुरु झालेल्या बैठकीचा पहिला टप्पा ३ तास चालला. यानंतर काँग्रेसचे काही नेते बैठकीचा निरोप घेऊन सोनिया गांधींच्या भेटीला गेले. सोनिया गांधींची भेट घेऊन काँग्रेसचे नेते पुन्हा एकदा शरद पवारांच्या निवासस्थानी आले, यानंतर पुन्हा एकदा बैठक सुरु झाली. अखेर रात्री ११ वाजण्याच्या सुमारास ही बैठक संपली.
काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या बैठकीला दोन्ही पक्षाचे ज्येष्ठ नेते उपस्थित होते. या बैठकीला काँग्रेसकडू अहमद पटेल, के सी वेणुगोपाल, मल्लिकार्जुन खरगे, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, नसीम खान तर राष्ट्रवादीकडून शरद पवार, सुप्रिया सुळे, अजित पवार, नवाब मलिक, छगन भुजबळ, सुनिल तटकरे उपस्थित होते.