मुंबई : अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसशी बंड करत भाजपशी हातमिळवणी केली. त्यानंतर राष्ट्रवादीच्या विधीमंडळ गटनेते पदावरून त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. आता शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांनी याविरोधात याचिका दाखल करत फ्लोअर टेस्ट आजच घ्यावी अशी मागणी केली आहे. देवेंद्र फडणवीस यांना सरकार स्थापनेसाठी आमंत्रित करण्याचा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा निर्णय रद्द करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी सर्वोच्च न्यायालयात केली आहे. महाराष्ट्र विधानसभेचे विशेष अधिवेशन तातडीने बोलावण्याचे आदेश न्यायालयाने द्यावेत अशीही मागणी केली आहे.
Shiv Sena: Shiv Sena has filed a writ petition in the Supreme Court against Devendra Fadnavis and Ajit Pawar taking oath as CM and Deputy CM of Maharashtra respectively. #Maharashtra pic.twitter.com/AoyIwrp48T
— ANI (@ANI) November 23, 2019
राजभवनावर झालेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शपथविधीविरोधात ही याचिका दाखल केली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची सकाळी यशवंतराव चव्हाण सेंटर येथे बैठक झाली. त्यावेळीच कायदेशीर मार्गाने लढाई लढणार असल्याचे तिन्ही पक्षांनी स्पष्ट केले होते. त्यानुसार ही याचिका दाखल करण्यात आली आहे.
या प्रकरणात देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना प्रतिवादी केले. तसेच केंद्र आणि राज्य सरकारला प्रतिवादी करण्यात आले आहे. न्यायमूर्ती एन व्ही रमण्णा, न्यायमूर्ती अशोक भूषण आणि न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्यासमोर सुनावणी होणार आहे.
१. आजच (रविवारी) विधीमंडळात फ्लोअर टेस्ट घेण्याचे आदेश द्यावे.
२. आजच विधानसभा सदस्यपदाची शपथ द्यावी.
३. राज्यपालांनी देवेंद्र फडणवीस यांना कोणत्या आधारावर शपथविधीसाठी निमंत्रण पाठवले. त्या संदर्भात कागदपत्रे सादर करावी. (कर्नाटकात जी परमेश्वरराव केसमध्ये सुप्रीम कोर्टानं कागदपत्रे सादर करण्याचे आदेश दिले होते. त्याचा संदर्भ देऊन मागणी केलीय.)
४. फ्लोअर टेस्टचं व्हिडीओ रेकाँर्डींग करावं आणि त्याची काँपी सर्वोच्च न्यायालयात सादर करावी.
५. फ्लोअर टेस्ट घेण्यासाठी विधानसभेचा अध्यक्ष निवडण्यात यावा.
६. विधीमंडळात शक्तीप्रदर्शन चाचणीवेळी समर्थन आणि विरोधी गट तयार करावे. त्यानंतरच मतमोजणी करावी. म्हणजे समर्थनातील एका बाजूला उभे करावे आणि समर्थन नसलेले दुसऱ्या बाजूला उभे करावे.
७. फ्लोअर टेस्ट होई पर्यंत देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी राज्यासंदर्भातचे कोणताही धोरणात्मक निर्णय घेऊ नये.
दरम्यान यशवंतराव चव्हाण सेंटर येथे झालेल्या बैठकीला राष्ट्रवादीचे ५० आमदार उपस्थित होते असे सांगितले जाते. अजित पवारांनी काल सकाळी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊन शरद पवारांना धक्का दिला. आता राष्ट्रवादीचे सर्व आमदार शरद पवारांसोबत दिसत असले तरी ३० नोव्हेंबरला विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याच्यावेळी आमदार कोणाच्या बाजूने उभे राहतात ? याकडे लक्ष आहेत.