उद्रेक! कोरोना रुग्णांची संख्या ४५ हजारांहून अधिकने वाढली

कोरोनाला रोखण्यासाठी सर्व परिंनी प्रयत्न सुरु   

Updated: Jul 23, 2020, 11:16 AM IST
उद्रेक! कोरोना रुग्णांची संख्या ४५ हजारांहून अधिकने वाढली  title=
संग्रहित छायाचित्र

नवी दिल्ली : Coronavirus कोरोना व्हायरसच्या रुग्णांचा आकडा देशात दिवसागणित वाढतच चालला आहे. परिणामी आरोग्य यंत्रणांवर याचा प्रचंड ताण आला आहे. सर्वतोपरी कोरोनाला आळा घालण्यासाठीचे प्रतिबंधात्मक उपाय योजले जात असतानाही भारतात कोरोना रुग्णांचा झपाट्यानं वाढणारा आकडा मात्र काही केल्या कमी होण्याचं नाव घेताना दिसत नाही. 

केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार मागील चोवीस तासांमध्ये देशातील कोरोना रुग्णसंख्येत तब्बल ४५,७२० इतक्या संख्येनं वाढ झाली आहे. कोरोना रुग्णांमध्ये नव्यां वाढ होण्याचा हा आतापर्यंतचा सर्वाधिक मोठा आणि तितकाच चिंतातूर करणारा आकडा ठरत आहे. 

४५ हजारांपेक्षाही अधिक संख्येने कोरोना रुग्ण वाढल्यामुळं आता भारतात एकूण कोरोनाबाधितांचा आकडा हा १२ लाखांच्याही पलीकडे पोहोचला आहे. इतकंच नव्हे, तर गेल्या चोवीस तासांमध्ये कोरोनामुळं प्राण गमावलेल्यांची संख्याही ११२९ इतकी झाली आहे. आतापर्यंतचा मृतांचा हा सर्वाधिक मोठा आकडा ठरत आहे. 

देशातील एकूण कोरोनाबाधितांविषयी सांगावं तर, आतापर्यंत देशात १२,३८,६३५ कोरोनाबाधित आढळले आहेत. यामध्ये ४,२६,१६७ रुग्णांवर सध्या कोरोनाचे उपचार सुरु आहेत. तर, ७,८२,६०६ रुग्णं कोरोनातून सावरले आहेत. देशभात कोरोनामुळं २९,८६१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

 

कोरोनाचा संसर्ग होणाऱ्या रुग्णांची संख्या अशाच वेगानं वाढत राहिल्यास येत्या काही दिवसांमध्ये हा आकडा १३ लाखांच्या घरात पोहोचण्याची भीती वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, कोरोनाचं हे संकट अधिक गडद होताना दिसत असतानाच देशभरात चाचण्यांची संख्याही वाढवण्यात आली आहे. ICMR च्या वृत्तानुसार २२ जुलैपर्यंत देशात 1,50,75,369 जणांची चाचणी करण्यात आली आहे. ज्यापैकी मागील चोवीस तासांमध्ये 3,50,823 चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यामुळं येत्या काळात कोरोनाच्या रुग्णसंख्येचा वेग नियंत्रणात आणण्यात देशातील आरोग्य यंत्रणांना यश येतं का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.