नवी दिल्ली : मोदी मंत्रिमंडळात जुन्यांना संधी न देता नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. मोदी सरकारमध्ये ५७ मंत्री असणार आहेत. असे असले तरी जुन्यांना संधी देण्यात आलेली नाही. यात अरूण जेटली, सुषमा स्वराज, सुरेश प्रभू, मनेका गांधी, उमा भारती, जेपी नड्डा, राधामोहन सिंग यांचा समावेश आहे. नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले आहेत. त्यांच्या मंत्रीमंडळामध्ये २४ जणांना कॅबिनेट मंत्री म्हणूनही शपथ देण्यात आली. तर २४ राज्यमंत्री आणि ९ स्वतंत्र कारभार असणारे मंत्री असणार आहेत.
मागील मोदी सरकारमध्ये अरूण जेटली, सुषमा स्वराज, उमा भारती, सुरेश प्रभू यांचा समावेश होता. अरूण जेटली हे मागच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री होते. मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांनी शपथविधी सोहळ्याच्या एक दिवस आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून कोणतीही जबाबदारी देऊ नका, अशी विनंती केली होती. ही विनंती मान्य करत त्यांना कोणतेही केंद्रीय मंत्रीपद देण्यात आले नाही.असे असले तरी संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे यांना मंत्रीमंडळात स्थान देण्यात आलेले नाही.
तसेच माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी प्रकृतीचे कारण देत निवडणूक लढवण्यास नकार दिला होता. त्यामुळे त्यांचीही कोणत्याच मंत्रिपदी वर्णी लागलेली नाही. मागील सरकारच्या काळात म्हणजेच २०१४ ते २०१९ या काळात सुषमा स्वराज यांनी एक सक्षम परराष्ट्र मंत्री म्हणून काम केले. सुरेश प्रभू हे आधी रेल्वेमंत्री होते. ते राज्यसभेवर निवडणून गेले होते. प्रभूंकडे नंतर हवाई खात्याचा कारभार सोपविण्यात आला होता. तर उमा भारती यांनाही केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलेले नाही. गंगा स्वच्छता अभियानाचा स्वतंत्र कार्यभार त्यांना देण्यात आला होता. तर मनेका गांधी यांनाही स्वतंत्र कार्यभार देण्यात आला होता. यावेळी त्यांना संधी देण्यात आलेली नाही.
माजी ऑलिंम्पिक आणि क्रीडा व सूचना आणि प्रसारण मंत्रालयाचा कार्यभार संभाळणारे राज्यवर्धन राठोड, पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्री महेश शर्मा, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री जयंत सिन्हा यांना संधी देण्यात आलेली नाही. अनुप्रिया पटेल (अपना दल) यांना मोदी कॅबिनेट स्थान मिळालेले नाही तर जेडीयू सरकारमध्ये सहभागी झालेली नाही. कारण त्यांना एकच मंत्रीपद दिल्याने बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार नाराज झाले आहेत. आम्हाला गरज नाही, असे सांगून नाराजी व्यक्त केली.