नवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावाला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेत उत्तर देणार आहेत. लोकसभेत त्यासाठी दुपारी 12ची वेळ निश्चित करण्यात आलीय. काल दिवसभर धन्यवाद प्रस्ताववर सर्वपक्षीय नेत्यांनी आपले विचार मांडले.
भाजपच्या सदस्यांनी मोदीं सरकारच्या कामांचा पाढा वाचला. तर काँग्रेससह इतर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सरकारवर जोरदार टीका केली. नोटाबंदी आणि जीएसटीच्या अंमलबजाणीमुळे अर्थव्यवस्थेवर झालेल्या विपरीत परिणामावरून लोकसभेतील काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगेंनी टीका केली.
जीएसटीच्या चढ्या दरांमुळे देशातील सामान्य जनेतेवर ताण येत असल्याचंही खरगे म्हणाले. याशिवाय सरकारच्या पाकिस्तानशी असणाऱ्या संबंधांबद्दलही खरगेंनी टीका केली.
पाकिस्तानकडून होणाऱ्या हल्ल्यांविषयी टीका करताना खरगेंनी कुठे आहे ५६ इंची छाती, असा सवालही विचारला. पंतप्रधान देशबाहेर जाऊन मोठमोठ्या गप्पा मारतात. मग संसदेत का बोलत नाहीत असा प्रश्नही खरगेंनी विचाराला.