नरेंद्र मोदी यांचा पंतप्रधानपदाचा राजीनामा, 'या' तारखेला करणार सत्ता स्थापनेचा दावा

Loksabha Election 2024 : नरेंद्र मोदींनी राष्ट्रपतींकडे पंतप्रधान पदाचा राजीनामा सोपवला आहे. 7 जूनला भाजपच्या संसदीय पक्षासह एनडीएचीही बैठक आहे. त्यानंतर भाजप सत्ता स्थापनेचा दावा करणार आहे. 

राजीव कासले | Updated: Jun 5, 2024, 03:52 PM IST
नरेंद्र मोदी यांचा पंतप्रधानपदाचा राजीनामा, 'या' तारखेला करणार सत्ता स्थापनेचा दावा title=

Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणूक निकालानंतर नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) पंतप्रधानपदाचा राजीनामा दिलाय. राष्ट्रपतीं द्रोपर्दी मुर्मु यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारलाय. तर 7 जूनला भाजपच्या संसदीय पक्षासह एनडीएची (NDA) बैठक होणारे. या बैठकीमध्ये मोदींनाच नेता म्हणून निवडण्यात येणार असल्याची माहिती मिळतेय. संसद भवनात या दोन्ही बैठका होणारेत. तर मोदी सरकारचा शपथविधी 8 जूनला होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय...

देशात भाजप सर्वात मोठा पक्ष
लोकसभा निवडणूक 2024 निकालात भाजपाला 240 जागा मिळाल्या असून सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. एनडीकडे एकूण 293 जागा आहेत, त्यामुळे त्यांच्याकडे बहुमत असून एनडीए तिसऱ्यांदा सत्तेत येणार हे जवळपास निश्चित आहे.  7 जूनला भाजपाच्या संसदीय मंडळाची बैठक होईल. या बैठकीत नरेंद्र मोदी यांना नेता म्हणून निवडलं जाईल. 

8 जूनला मोदी शपथ घेणार
लोकसभा निवडणुकीचा निकाल आल्यानंतर दिल्लीत हालचालींना वेग आला आहे. एनडीएबरोबर इंडिया आघाडीच्या नेत्यांच्याही बैठकींचं सत्र सुरु झालं आहे. इंडिया आघाडीकडूनही सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी रणनिती आखली जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात याच आठवड्यात एनडीए सत्तास्थापनेचा दावा करण्याची शक्यता आहे. एनडीएचे नेते नरेंद्र मोदी 8 जूनला तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतील.

केंद्रीय मंत्रीमंडळाच्या शपथविधीसाठी राष्ट्रपती भवन 5 ते 9 जूनदरम्यान सामान्य लोकांसाठी बंद ठेवण्यात आलं आहे. राष्ट्रपती द्रौपती मुर्मु यांनी नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्र सरकारच्या सर्व विद्यमान मंत्र्यांना डिनरसाठी आमंत्रित केलं आहे.