खेड: रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी नदीला पूर आल्याने बुधवारी रात्री मुंबई-गोवा मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर बुधवारी सकाळपासून खेड तालुक्यात पुन्हा मुसळधार पाऊस पडायला सुरुवात झाली होती. त्यामुळे रात्रीपर्यंत जगबुडी नदीच्या पातळीत तब्बल सात मीटरने वाढ झाली. अखेर जगबुडीचे पाणी जुन्या पुलाला पोहोचण्याची परिस्थिती निर्माण झाल्यानंतर खेडचे तहसीलदार शिवाजी जाधव यांनी घटनास्थळी धाव घेत जगबुडी पुलावरील वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला. सध्या नदीवरील पुलाच्या दोन्ही बाजूंना पोलीस तैनात करण्यात आले आहेत.
यामुळे सध्या मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या मोठमोठ्या रांगा लागल्या आहेत. जगबुडी नदीसह वाशिष्ठी आणि नारिंगी नदीच्या पाण्याची पातळीही वाढली आहे. त्यामुळे येथील नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
गेल्या आठवड्यातही रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला होता. वाशिष्ठी नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने चिपळूणमधील बाजार पूल, वड नाका, खाटीक आळी हा भाग पाण्याखाली गेला होता. तसेच चिपळूण बाजारपेठेतही पाणी शिरले होते.
पुण्यातील खडकवासला धरण ९५ टक्के भरले
पुण्यात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे खडकवासला धरण ९५ टक्के भरले आहे. त्यामुळे बुधवारी संध्याकाळी सात वाजल्यापासून धरणातून ५०० क्युसेक पाण्याच्या विसर्गाला सुरुवात झाली आहे. रात्री कालव्यातून विसर्ग वाढवता येत नसल्याने सकाळी नदीपात्रात पाणी सोडले जाईल. रात्री ११ वाजल्यापासून नदी पात्रात २००० क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जाईल. पाऊस असाच सुरु राहिल्यास पुढील तीन ते चार तासांमध्ये धरण भरेल, अशी माहिती कार्यकारी अभियंता पांडुरंग शेलार यांनी दिली.