'अयोध्येत राम मंदिर उभारलं तर...' पाहा काय म्हणाला बाबरचा वंशज

अयोध्येतल्या राम मंदिरप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे.

Updated: Aug 19, 2019, 04:40 PM IST
'अयोध्येत राम मंदिर उभारलं तर...' पाहा काय म्हणाला बाबरचा वंशज title=

नवी दिल्ली : अयोध्येतल्या राम मंदिरप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. शेवटचा मुगल शासक बहादूर शाह जफरचा वंशज असल्याचा दावा करणाऱ्या प्रिन्स हबीबुद्दीन तुसी यांनी या मुद्द्यावर भाष्य केलं आहे. अयोध्येत राम मंदिर बांधलं गेलं, तर आपण सोन्याची वीट देऊ, असं हबीबुद्दीन म्हणाले. तसंच अयोध्येतील वादग्रस्त जमीन आपल्याला देण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. या जमिनीवर आपला अधिकृत हक्क आहे, कारण आपण पहिले मुगल शासक बाबर याचे वंशज आहोत, ज्यांनी बाबरी मशिद उभारली, असा दावाही हबीबुद्दीन यांनी केला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने संपूर्ण जमीन आपल्याला दिली, तर आपण ही जमीन राम मंदिर उभारण्यासाठी दान करू, असं वक्तव्य हबीबुद्दीन यांनी केलं आहे. मला लोकांच्या भावनांचा आदर आहे, त्यामुळे त्याच ठिकाणी राम मंदिर उभारलं गेलं पाहिजे, असं मत हबीबुद्दीन यांनी मांडलं.

अयोध्या राम जन्मभूमीच्या वादात आपल्याला पक्षकार करण्यात यावं, अशी याचिका प्रिन्स हबीबुद्दीन यांनी सर्वोच्च न्यायालयात केली आहे. पण या याचिकेवर अद्याप सुनावणी झालेली नाही. या खटल्यात जेवढे पक्षकार आहेत, त्यांच्या कोणाकडेच जमिनीच्या मालकी हक्कासंबंधात कोणतेच कागदपत्र नाहीत, असा आरोप हबीबुद्दीन यांनी केला आहे.

प्रिन्स हबीबुद्दीन तुसी यांनी तीनवेळा अयोध्येत जाऊन रामलला यांची पूजा केली आहे. मागच्या वर्षी आपल्या यात्रेदरम्यान राम मंदिर निर्माणासाठी जमीन दान करण्याचं हबीबुद्दीन यांनी सांगितलं होतं. तसंच त्यांनी राम मंदिराच्या विध्वंसासाठी हिंदूंची माफीही मागितली होती. हबीबुद्दीन यांनी आपलं डोकं पादुकांवर ठेवून सांकेतिक माफी मागितली होती.