MP Crime : मध्य प्रदेशात (MP News) एका प्रेमी युगुलाच्या मृत्यूने खळबळ उडाली आहे. मध्य प्रदेशातील खरगोनमधून ही हृदयद्रावक घटना समोर आली आहे. विष पिऊन हे प्रेमी जोडपे स्थानिक पोलीस ठाण्यात पोहोचले होते. मात्र पोलिसांना हकीकत समजताच त्यांनाही धक्का बसला. पोलिसांनी तात्काळ दोघांनाही रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारादरम्यान दोघांचीही प्राणज्योत मालवली आहे. या घटनेमुळे दोघांच्याही कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पोलिसांनी या प्रकरणाची नोंद करत तपास सुरु केला आहे.
मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यातील या प्रेमी युगुलाने एकत्र जगण्याची आणि मरण्याची शपथ घेतली होती. मात्र कुटुंबाची साथ न मिळाल्याने दोघांनीही एकत्रच मृत्यूला कवटाळले आणि आपले वचन पूर्ण केले. कासरवाडच्या माकडखेडा गावात हा सर्व धक्कादायक प्रकार घडला आहे. दोघांच्याही मृत्यूने सर्वांनाच धक्का बसला आहे. या तरुण प्रेमी युगुलाने एकत्र आत्महत्या करून जगाचा निरोप घेतला आहे. दोघेही एकाच गावचे असल्याने दोघांचे कुटुंबीय लग्नाला तयार नव्हते. मात्र दोघांच्याही कुटुंबियांनी याविषयी बोलण्यास नकार दिला आहे.
हे ही वाचा : लग्नाची वरात येण्याआधीच झाला जोरदार स्फोट.... मुलीची आई अन् काकीचा झाला कोळसा
गावात राहणाऱ्या तरुणासोबतच तरुणीचे दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. हा तरुण मुलठाण गावचा रहिवासी होता, मात्र तो बऱ्याच दिवसांपासून माकडखेडा गावात राहत होता. दोघांनाही लग्न करायचे होते, मात्र दोघांच्याही घरच्यांनी लग्नाला नकार दिला. यानंतर दोघांनी विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यानंतर काही ग्रामस्थांसह कासरवाड त्यांनी पोलीस ठाणे गाठले. तिथेच त्यांनी आमचे लग्न लावून द्या असी विनंती केली. मात्र दोघांची प्रकृती खालावल्याने त्यांना कासरवाड येथून गंभीर अवस्थेत जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. दोघांनाही अतिदक्षता विभागामध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाला.
गावकऱ्यांनी सांगितले की, या तरुणाचे तरुणीसोबत दोन वर्षांहून अधिक काळ प्रेमसंबंध होते. दोघांनाही आयुष्यभरासाठी एकत्र राहायचे होते. तरुणी 21 वर्षांची होती आणि तरुण 26 वर्षांचा होता. पण दोघांचेही कुटुंब त्यांच्या लग्नाला विरोध करत होते. त्यामुळे दोघे एकत्र येऊ शकत नव्हते. गुरुवारी रात्रीपासून तरुणी तरुणासोबत होती. दुसऱ्या दिवशी सकाळी अकराच्या सुमारास विष प्राशन करून दोघेही एकमेकांचा हात धरुन पोलीस ठाण्यात पोहोचले.
हे ही वाचा : नोकरीसाठी घराचं केलं स्मशान... आई वडिलांनाही सोडलं नाही...
तिथे पोहोचताच आमच्या दोघांचे लग्न लावून द्या अशी विनंती त्यांनी पोलिसांना केली. मात्र पोलिसांनी सगळा प्रकार समजून सांगण्यास सांगितले. मात्र तेवढ्यातच दोघेही बेशुद्ध पडले. दोघांची प्रकृती खालावू लागली. त्यानंतर दोघांनी आत्महत्या करण्यासाठी किटकनाशक प्यायल्याचे समजले. पोलिसांनी त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र खरगोन जिल्हा रुग्णालयातच दोघांचा मृत्यू झाला. धक्कादायक बाब म्हणजे या दोघांच्या मृत्यूनंतरही त्यांचे कुटुंबिय रुग्णालयात आले नाहीत. पोलिसांनीच दोघांच्या कुटुंबीयांना त्यांच्या मृत्यूची माहिती दिली.