पती-पत्नी आणि मुलाची एकाच वेळी आत्महत्या; चिठ्ठीतून समोर आलं धक्कादायक कारण

MP Crime News : मध्य प्रदेशात एकाच कुटुंबाने एकत्र आपली जीवनयात्रा संपवल्याने खळबळ उडाली आहे. मात्र संपूर्ण कुटुंबाने एकत्र आत्महत्येचे पाऊल उचलल्याने लोकांना धक्का बसला आहे. 

आकाश नेटके | Updated: Jan 28, 2024, 03:48 PM IST
पती-पत्नी आणि मुलाची एकाच वेळी आत्महत्या; चिठ्ठीतून समोर आलं धक्कादायक कारण title=

MP Crime News : मध्य प्रदेशच्या ग्वालेरमधून हादरवणारी बातमी समोर आली आहे. मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर जिल्ह्यात एकाच कुटुंबातील तिघांनी आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. पोलिसांना घटनास्थळावरून एक सुसाईड नोटही सापडली आहे. शनिवारी संध्याकाळपासून हे कुटुंब दिसले नसल्याचे आजूबाजूच्या लोकांनी सांगितले. त्यानंतर रविवारी सकाळी हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

ग्वाल्हेरमध्ये संपूर्ण कुटुंबाने एकत्र गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे. सिरोल पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा सगळा प्रकार घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी एका घरात राहणाऱ्या कुटुंबातील सर्वांचे मृतदेह फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळले. या कुटुंबात पती, पत्नी आणि त्यांचा मुलगा राहत असल्याचे सांगण्यात येत आहे. तिघांचेही मृतदेह फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळल्यानंतर तिघांनी मिळून आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. 

मृत जितेंद्र झा हे पत्नी त्रिवेणी आणि मुलगा अचल यांच्यासह हुरावली परिसरात राहत होते. जितेंद्र हे व्यवसायाने मजूर होते. त्यांचे घर दोन दिवस बंद होते. रविवारी सकाळी घरातून दुर्गंधी येत असल्याने आजूबाजूचे लोक हैराण झाले होते. यानंतर त्यांनी घरातून दुर्गंधी येत असल्याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून दरवाजा उघडून घरात प्रवेश केला. त्यानंतर सर्वांचे मृतदेह फासावर लटकलेले आढळले. जितेंद्र झा यांच्या हातावर कापल्याच्या खुणा होत्या. प्राथमिक तपासात पोलिसांनी मृतांचे मोबाईल जप्त केले आहेत. पोलीस सध्या या प्रकरणाचा खून आणि आत्महत्या अशा दोन्ही बाजूंनी तपास करत आहेत

"घटनास्थळी मृत वडिलांनी लिहीलेली एक सुसाईड नोट सापडली असून त्यात, एका विशिष्ट व्यक्तीच्या नाराजीमुळे मुलाने आत्महत्या केली आहे. आता मीही आत्महत्या करणार आहेत. ही सुसाईड नोट पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. घटनास्थळी फॉरेन्सिक तज्ज्ञालाही पाचारण करण्यात आले. या प्रकरणाचा तपास सुरू आहे," अशी माहिती पोलीस अधीक्षक राजेश सिंह चंदेल यांनी दिली.

दरम्यान, आनंदी अशा कुटुंबाने एकत्र येऊन गळफास घेऊन आत्महत्या केल्याने संपूर्ण परिसराला धक्का बसला आहे. नातेवाईक आणि ओळखीचे लोकही घटनास्थळी पोहोचले आहेत. पण संपूर्ण कुटुंबाने हे आत्महत्येचे पाऊल का उचलले हे समजू शकलेले नाही.