मुंबई : केंद्र सरकारने इंधनावरील सबसिडी टप्प्याटप्प्याने कमी केल्याने देशात पेट्रोल व डिझेलचा दर सातत्याने वाढत आहे. त्यामुळे आशिया खंडात सर्वात महागडे पेट्रोल भारतात मिळत आहे.
एलपीजी सिलिंडरवरील सबसिडी कमी करत प्रत्येक महिन्यात एलपीजी सिलिंडरचा दर दोन रुपयांनी वाढवावा, असे सरकारने इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम व हिंदुस्थान पेट्रोलियम या कंपन्यांना सांगितले आहे. त्यानुसार सध्या एलपीजीचे दरही वाढत आहेत. केरोसिनवरील सबसिडी जशी टप्प्याटप्प्याने बंद करण्यात आली, त्याचप्रमाणे एलपीजीवरील सबसिडीही कमी करण्यात येत आहे.
मलेशिया, इंडोनेशिया, भूतान, म्यानमार या आशियाई देशांच्या तुलनेत भारतात पेट्रोल व डिझेलचा दर सर्वाधिक असल्याचे उघड झाले आहे. १ सप्टेंबर रोजीच्या आकडेवारीनुसार, भारतात पेट्रोल ६९.२६ रुपयांना विकले जात होते तर मलेशियात ते ३२.१९ रुपये प्रतिलीटर या दराने विकले जात होते. याच दिवशी इंडोनेशियात भारताच्या तुलनेत पेट्रोलचा दर ४१ टक्के कमी होता.
जागतिक बाजारात प्रति बॅरल कच्च्या खनिज तेलाचा दर २०१४ पासून सातत्याने खाली येत आहे. हा दर २०१४ पासून १०६ डॉलर होता तर यावर्षी ५१ डॉलर आहे. तरीही देशात इंधन महाग मिळत असल्याने नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त होत आहे.