मुंबई : सध्या कोरोनाचे संकट आहे. असे असताना अर्धा मे महिना होत असल्याने मान्सूनचीही चाहूल लागली आहे. यंदा पाऊस चांगला होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. मान्सून पाऊस सरासरीइतका कोसळणार असल्याचा अंदाज व्यक्त केला गेला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार मोसमी पावसाच्या प्रवासाला अनुकूल स्थिती निर्माण झाल्याने तो १६ मेपर्यंत अंदमान, निकोबार बेट आणि बंगालच्या उपसागराच्या दक्षिण भागात प्रवेश करु शकतो, असा अंदाज आहे.
सर्वसाधारणपणे दक्षिणेकडून म्हणजेच केरळमधून मान्सूनची सुरुवात होते. एक जूनला केरळमध्ये जर मान्सून उशिरा दाखल झाला तर उर्वरीत भारतातही मान्सूनच्या वेळापत्रकात बदल पाहायला मिळतो. दरवर्षी २० मे रोजी अंदमानात धडकणारा मान्सून यंदा चार दिवस आधीच येणाची शक्यता आहे. १६ मेपर्यंत दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान विभाग आणि स्कायमेटने वर्तवला आहे. मान्सून अंदमानात दाखल झाल्यानंतर पाच दिवसानंतर श्रीलंकेकडे रवाना होऊन तो आठवडाभरानंतर केरळमध्ये दाखल होईल.
दरम्यान, महाराष्ट्र राज्यात मान्सूनपूर्व पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. गेल्या चोवीस तासांत विदर्भात अनेक ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली. या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकासान झाले आहे. १५ मेपर्यंत विविध भागांत मान्सून पूर्व पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज आहे. १३ ते १५ मे या कालावधीत प्रामुख्याने विदर्भात विजांच्या कडकडाटासह आणि मध्य महाराष्ट्रात तुफान वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. १४ मे रोजी कोकण विभागातही पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
स्कायमेटच्या अंदाजानुसार, यंदा देशात मान्सूनचे आगमन उशीरा होण्याची शक्यता आहे. त्यानुसार, जूनच्या दुसऱ्या आठवड्यात मान्सून मुंबईमध्ये दाखल होईल. ११ जूनपर्यंत मान्सून मुंबईमध्ये येण्याची शक्यता आहे. तेलंगणा, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, झारखंड, बिहार आणि उत्तर प्रदेशात मान्सून उशिरा येऊ शकतो. उत्तर आणि पश्चिम भारतातही १५ जुलैऐवजी ८ जुलैला मान्सून दाखल होईल. राजधानी दिल्लीमध्ये यंदा २३ जून ऐवजी २७ जूनला मान्सूनची शक्यता स्कायमेटने वर्तविली आहे.