मोहन भागवतांनी मोदींचा राजीनामा मागायला पाहिजे- प्रकाश आंबेडकर

निवडणुकीत दलित समाजाने भाजपला साथ दिली नाही म्हणून त्यांना त्रास दिला जात आहे.

Updated: Mar 2, 2020, 02:15 PM IST
मोहन भागवतांनी मोदींचा राजीनामा मागायला पाहिजे- प्रकाश आंबेडकर title=

नवी दिल्ली: दिल्लीतील हिंसाचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच जबाबदार आहेत. त्यामुळे सरसंघचालक मोहन भागवत यांनी नरेंद्र मोदींचा राजीनामा मागितला पाहिजे, असे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी केले. ते सोमवारी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले की, दिल्लीतील दंगलीत हिंदुंची जीवितहानी आणि आर्थिक नुकसान झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सगळ्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. तसेच मोहन भागवत यांनीही मोदींकडून पंतप्रधानपदाचा राजीनामा मागायला पाहिजे, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले. 

तसेच दिल्ली दंगलीत दलितांना गोवण्याचे काम सुरु असल्याचाही आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला. दलित समाजातील अनेक लोकांना धमक्या दिल्या जात आहेत. निवडणुकीत दलित समाजाने भाजपला साथ दिली नाही म्हणून त्यांना त्रास दिला जात असल्याचेही त्यांनी सांगितले. 

यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी नागरिकत्व सुधारणा कायद्यासंदर्भातही (CAA)भाष्य केले. महाराष्ट्राच्या विधिमंडळात CAA विरोधात मांडण्याची गरज नाही. मुस्लिम आणि दलितांची मते चालतात. मग राजकीय पक्षांकडून त्यांचे संरक्षण का केले जात नाही, असा सवाल यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला. 

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या सत्रातही दिल्ली हिंसाचाराचे पडसाद उमटले. यावेळी विरोधकांकडून दिल्ली हिंसाचारासंदर्भात चर्चेची मागणी करण्यात आली. तसेच विरोधकांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे.