Modi In USA For Quad Summit: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमेरिकेतील 'क्वाड' देशांच्या समूहामध्ये केलेल्या भाषणावरुन उद्धव ठाकरेंच्या पक्षाने सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. भारतीय भूभागावर घुसखोरी करणाऱ्या चीनविरुद्ध बोलण्याची धमक केंद्रात सत्तेत असलेल्या भारतीय जनता पार्टीचे तीन प्रमुख नेते दाखवत नाहीत असं ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलं आहे. पाकिस्तानला इशारा देताना थेट नाव घेऊन दिला जातो. मात्र मोदींबरोबर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा चीनचं साधं नावही घेत नसल्याचा टोला ठाकरेंच्या शिवसेनेनं लगावला आहे. इतक्यावरच न थांबता ठाकरेंच्या पक्षाने 'पाकिस्तानचा अजेंडा हा भारतात मोदींना मदत करण्याचा' असल्याचं म्हटलं आहे.
"चीनने भारताच्या 2000 किलोमीटर जमिनीचा ताबा घेतला आहे. म्हणजे कोणत्याही आक्रमणाशिवाय चीनने भारताच्या जमिनीवर पाय रोवले. यावर पंतप्रधान मोदी यांनी अमेरिकेच्या भूमीवरून चीनला अप्रत्यक्ष इशारा देण्याचा पराक्रम केला. या पराक्रमाबद्दल आपल्या पंतप्रधानांना वीरचक्राने सन्मानित करायला हरकत नाही. ‘क्वाड’ देशांच्या समूहात भाषण करण्यासाठी मोदी अमेरिकेत गेले. तेथे ते अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन वगैरे नेत्यांना भेटल्याची छायाचित्रे प्रसिद्ध झाली आहेत. या सोहळ्यात मोदी यांनी काही विचार मांडले ते क्लिष्ट आणि बिनकामाचे आहेत. मुक्त, खुल्या आणि सर्वसमावेशक हिंद-प्रशांत क्षेत्राला आमचे प्राधान्य असल्याचे सांगत त्यांनी चीनचे नाव न घेता इशारा दिला. त्यामुळे त्यांचा हा पोकळ इशारा चीनपर्यंत पोहोचला काय? चीनने भारताच्या सीमा तोडून घुसखोरी करायची व आपण चीनचे नाव न घेता इशारे द्यायचे. हा प्रकार राष्ट्रीय स्वाभिमानाचा नाही," असा खोचक टोला 'सामना'मधून लगावण्यात आला आहे.
"पाकिस्तानच्या बाबतीत मोदी, अमित शहा हे वारंवार नाव घेऊन धमक्या देत असतात, पण चीनच्या बाबतीत मात्र नाव घेण्याची हिंमत ते दाखवत नाहीत. मोदी अमेरिकेत आहेत, तर गृहमंत्री अमित शहा कश्मीरच्या निवडणुकीत पाकिस्तानचे नाव घेऊन धडा शिकवण्याची भाषा करीत आहेत. कश्मीरच्या प्रचारसभेत गृहमंत्री शहा म्हणाले की, ‘‘दहशतवाद संपुष्टात येईपर्यंत पाकिस्तानसोबत चर्चा करणार नाही. पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी तसेच शांततेसाठी जम्मू आणि कश्मीरमध्ये भाजप सत्तेत येणे गरजेचे आहे.’’ गृहमंत्र्यांचे हे वक्तव्य म्हणजे सत्ताप्राप्तीसाठी केलेली धूळफेक आहे. दहशतवाद संपुष्टात येईपर्यंत पाकड्यांशी चर्चा नाही, असे ते म्हणतात. याचा अर्थ गृहमंत्र्यांनी कबुली दिली की, मोदी शासनाच्या दहा वर्षांत ते कश्मीरात शांतता आणू शकले नाहीत. मोदी काळात पुलवामा घडले. चाळीस जवानांच्या बलिदानामागे नक्की कोण? याचाही तपास शहा करू शकले नाहीत," असं ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलं आहे.
नक्की वाचा >> आव्हाडांना वेगळीच शंका! युपी-बिहारचा उल्लेख करत म्हणाले, 'अक्षय शिंदेला शाळेतील काही...'
"370 कलम हटवले व त्याचे राजकीय श्रेय घेतले. पण कश्मीरात अशांतता व दहशतवाद कायम आहे. हे सर्व पाकिस्तान करत आहे व पाकिस्तानला चीनचे बळ आहे. त्यामुळे गृहमंत्री शहा यांनी पाकिस्तानबरोबरच चीनलाही फैलावर घेतले पाहिजे, पण चीनचे नाव घ्यायला हातभर फाटते व तोंड फाटेपर्यंत पाकिस्तानला इशारे देणे सुरू आहे. असे हे दोन अंकी नाटक चालले आहे," अशी टीका ठाकरेंच्या पक्षाने केली आहे.
"भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनीही असा आरोप केला आहे की, काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स हे राष्ट्रविरोधी पक्ष आहेत आणि हे दोन पक्ष पाकिस्तानचा अजेंडा जम्मू आणि कश्मीरात राबवत आहेत. त्यासाठी त्यांनी पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांची साक्ष काढली आहे. पाकिस्तानचा अजेंडा म्हणजे नेमके काय? हे एकदा स्पष्ट होऊ द्या. जम्मू-कश्मीरात निवडणुका लागल्यावर भाजपास मदत होईल अशी विधाने पाकिस्तानातील काही नेते करीत असतात. भाजपच्या पगारी नोकरांप्रमाणे तेथील काही लोक वागतात व बोलतात हे वारंवार दिसून आले आहे. पाकिस्तानचा अजेंडा हा भारतात मोदींना मदत करण्याचा आहे व त्याबद्दल तेथील काही प्रमुख नेत्यांना फायदे पोहोचवले जातात. मोदींच्या लाडक्या उद्योगपतींचे व्यापार व उद्योग बांगलादेश, पाकिस्तानात आहेत व तेच हे सर्व उद्योग पडद्यामागे घडवीत असावेत या संशयास जागा आहे," असं ठाकरेंच्या शिवसेनंचं मुखपत्र असलेल्या 'सामना'मध्ये म्हटलं आहे.
"वास्तविक, पाकिस्तानच्या अजेंड्यापेक्षा चीनचा जो अजेंडा देशात राबवला जातोय तो चिंताजनक आहे. पाकिस्तान चीनचीच पिलावळ आहे. भारताच्या सीमेवरील सर्व राष्ट्रांत चीनने हातपाय पसरले आहेत. सीमेवरील एकही राष्ट्र भाजपचे मित्र नाही व आता चीनधार्जिणे अनुरा कुमारा दिसानायके हे श्रीलंकेचे नवे राष्ट्राध्यक्ष झाले आहेत. म्हणजे मालदीव, श्रीलंका, बांगलादेशच्या सागरात आता चीनचे आरमार तळ ठोकेल व भारतापुढे आव्हान उभे राहील. पंतप्रधान मोदी, गृहमंत्री शहा व संरक्षणमंत्री राजनाथ सिंह या संकटावर न बोलता पाकिस्तानवर मुक्ताफळे उधळतात. चीनने भारताच्या सर्व सीमांवर ताबा मिळवला आहे. लडाख, अरुणाचलमध्ये घुसखोरी केली आहे. त्या चीनवर सर्जिकल स्ट्राईक न करता केंद्रीय मंत्रिमंडळातील त्रिकूट पाकिस्तानला धमक्या देत आहे. म्हणजे जखम पायाला व प्लास्टर पोटाला अशी अवस्था त्यांनी केली आहे. अमेरिकेत उभे राहून मोदी अप्रत्यक्षपणे चीनला नाव न घेता इशारा देतात. 2000 किलोमीटर जमीन चीनने घशात घातली तरी ना पंतप्रधानांचे रक्त खवळते ना गृहमंत्र्यांना संताप येतो, ना भाजपच्या अंधभक्तांची राष्ट्रभक्ती उफाळून येताना दिसते. डरपोक लेकाचे," असं म्हणत लेखाचा शेवट करण्यात आला आहे.