धक्कादायक! गळ्यात सुतळी बॉम्बची माळ घालून विधानसभेत पोहोचला आमदार अन्...

MLA Reaches Sutli Bomb Garland: या आमदाराकडे पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. मात्र हा आमदार अशाप्रकारे गळ्यात सुतळी बॉम्बची माळ घालून विधानसभेमध्ये येण्यामागे एक विशेष कारण होतं.

स्वप्निल घंगाळे | Updated: Feb 8, 2024, 02:12 PM IST
धक्कादायक! गळ्यात सुतळी बॉम्बची माळ घालून विधानसभेत पोहोचला आमदार अन्... title=
आमदाराने गळ्यात घातलेली सुतळी बॉम्बची माळ

MLA Reaches Sutli Bomb Garland: मध्य प्रदेशमधील हरदा येथील काँग्रेसचे आमदार रामकिशोर दोगने हे चक्क सुतळी बॉम्बची माळ घालून विधानसभेमध्ये पोहोचल्याने एकच खळबळ उडाली. अर्थात हे बॉम्ब नकली होते. मात्र अशाप्रकारे बॉम्बची माळ गळ्यात घालून विधानसभेमध्ये प्रवेश करण्यामागे एक खास कारण होतं. फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट घडल्याच्या घटनेचा निषेध करण्यासाठी या आमदाराने गांधींच्या फोटोसमोर आंदोलन केलं. मृतांच्या नातेवाईकांना 4 लाखांची भरपाई आणि कलेक्टरला निलंबित केल्याने काहीही होणार नसल्याचं या आमदाराचं म्हणणं होतं. हरदा येथील फटाका कारखान्यात झालेल्या स्फोटानंतर राज्य सरकारने कलेक्टर ऋषि गर्ग यांना पदावरुन हटवलं आहे. तर पोलीस निरीक्षक संजीव कुमार कंचन यांना भोपाळमधील मुख्यालयात हलवण्यात आलं.

संवेदनशीलपणे वागण्याची गरज

विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी हरदा येथील फटाका कारखान्यातील स्फोटाचा मुद्दा गाजत आहे. विरोधी पक्षाने सरकारला या विषयावरुन घेरण्याचा प्रयत्न करत आहे. याच आक्रमक भूमिकेचा भाग म्हणून आज विधानसभेमध्ये स्फोट झालेल्या हरदा येथील स्थानिक आमदाराने अशाप्रकारे बॉम्ब गळ्यात घालून निषेध नोंदवला. बॉम्बची माळ गळ्यात घालून विधानसभेत प्रवेश करणारे काँग्रेसचे आमदार दोगने यांनी, "दोषींविरोधात कठोर कारवाई केली पाहिजे. भाजपा नेते कमल पटेल यांच्या संरक्षणाअंतर्गत हा कारखानाल चालवला जात होता. अनेकांची आयुष्य या घटनेनं उद्धवस्त झाली आहेत. सरकारने संवेदनशीलपणे या प्रकरणाकडे पाहिले पाहिजे," असं म्हणत आपली भूमिका मांडली.

ज्याच्यावर आरोप होतोय तो नेता काय म्हणाला?

दुसरीकडे माजी कृषीमंत्री कमल पटेल यांनी या फटाक्यांच्या कारखान्याचे मालक राजू आणि मुन्ना पटेलचा भाऊ मन्नी याला काँग्रेस आमदार आर. के. दोगने यांचं संरक्षण असल्याचा दावा केला आहे.

घरं पडली, गुरं मेली

मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी बुधवारी जिल्हा रुग्णालयामध्ये जखमींची भेट घेण्यासाठी पोहोचले. डॉ. यादव यांनी रुग्णालय प्रशासनाने या दुर्घटनेत जखमी झालेल्यांवर सर्वोत्तम उपचार करण्याचे निर्देश दिले. या संकटाच्या काळात सरकार पीडितांबरोबर आहे. जी काही मदत शक्य होईल ती सर्व मदत आम्ही सरकार म्हणून करु, असा शब्द डॉ. यादव यांनी पीडितांना दिला. या भेटीदरम्यान पीडितांनी संपूर्ण घरं उद्धवस्त झाली. गुरंही मेली. मुख्यमंत्री डॉ. यादव यांनी जिल्हाधिकाऱ्यांना मोडतोड झालेल्या घरांची पंचनामा करण्याचे आदेश दिले तसेच या व्यक्तींच्या राहण्याची सोय करण्याचे निर्देश दिले. तसेच जखमी गुरांवरही योग्य उपचार करण्याचे निर्देशही दिले. मेलेल्या गुरांच्या मोबदल्यात पिडितांना पैसे दिले जाणार आहेत.

10 जणांचा मृत्यू

गंभीर जखमी असलेल्या 5 जणांना प्रत्येकी 1 लाखांच्या मदतीचे धनादेश देण्यात आले आहेत. अन्य जखमींना प्रत्येकी 25 हजार रुपये आर्थिक मदत देण्यात आली आहे. मृत व्यक्तींच्या नातेवाईकांना 4 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. या दुर्घटनेत एकूण 10 जणांचा मृत्यू झाला आहे.