चांद्रयान-3 च्या यशावरुन श्रेयवादाची लढाई, काँग्रेस म्हणतं नेहरुंची दुरदृष्टी, भाजपाच्या मते मोदींचं नेतृत्व

चांद्रयान-3 ने चंद्रावर पाऊल ठेवलं आणि भारताने नवा इतिहास रचला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावार यान उतरवणारा भारत हा पहिला देश ठरला आहे. अंतराळ क्षेत्रातली नवी सुपरपॉवर म्हणून भारताचा उदय झाला आहे.  पण या चांद्रयान मोहिमेच्या यशावरुन आता श्रेयवादाची लढाई सुरु झाली आहे. 

राजीव कासले | Updated: Aug 25, 2023, 03:26 PM IST
 चांद्रयान-3 च्या यशावरुन श्रेयवादाची लढाई, काँग्रेस म्हणतं नेहरुंची दुरदृष्टी, भाजपाच्या मते मोदींचं नेतृत्व title=

Mission Chandrayaan 3 : 23 ऑगस्टला बरोबर 6 वाजून 4 मिनिटांनी चांद्रयान (Chandrayaan) चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरलं आणि भारतानं नवा इतिहास घडवला. अमेरिका, रशिया आणि चीननं या देशांनी आधी चंद्रावर स्वारी केलीय. मात्र दक्षिण ध्रुवावर चांद्रयान उतरवणारा भारत (India) जगातला पहिलाच देश ठरलाय. त्यामुळं अंतराळ क्षेत्रातली भारत आता नवी महापॉवर (Super Power) बनलाय.   भारतीय चांद्रयान 3 सोबत स्पर्धा करत आधी तिथं पोहोचण्याचा खटाटोप केला. मात्र दुर्दैवानं रशियाचं यान चंद्रावर क्रॅश झालं. रशियाचं स्वप्न भंगलं. भारतानं मात्र चांद्रयान 3 यशस्वीपणं दक्षिण ध्रुवावर उतरवून तिथं तिरंगा फडकावला. 

आता श्रेयवादाची लढाई
चांद्रयान-3 मोहिम यशस्वी झाली, पण यावरुन आता श्रेयवादाच्या लढाईला सुरुवात झाली आहे. देशातचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांच्या दूरदृष्टीचं हे यश असल्याचं काँग्रेसने म्हटलंय. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत यशाची नवनवी शिखरं गाठत असून आपली वेगळी ओळख निर्माण करत आहे, चांद्रयान-3 मोहिम याचाच एक भाग असल्याचं भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी म्हटलं आहे. 

चंदामामा एक टूर आहे - पीएम मोदी
चांद्रयान-3 मोहिम यशस्वी झाल्यानंतर दक्षिण आफ्रिकेत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फर्सिंगच्या माध्यमातून देशवासियांना संबोधित केलं. 'भारत देशाने चंद्रावर तिरंगा फडकावला आहे आणि आता 'चंद्रपथा'वर चालण्याची वेळ आली आहे. 'जेव्हा आपण आपल्या डोळ्यांसमोर असा इतिहास घडताना पाहतो तेव्हा जीवन धन्य होतं, अशी प्रतिक्रिया पीएम मोदी यांनी दिली. संपूर्ण भारतीयांसाठी हा क्षण अविस्मरणीय आहे, हा क्षण अभूतपूर्व आहे, हा क्षण विकसित भारताचा शंखनाद आहे. नव्या भारताचा जयघोष करण्याचा हा क्षण आहे. अडचणींचा महासागर पार करण्याचा हा क्षण आहे. विजयाच्या चंद्रमार्गावर चालण्याचा हा क्षण आहे. हा क्षण 140 कोटी जनतेच्या ह्रदयाचा आवाज आहे. हा भारतातील नव्या ऊर्जेचा, नव्या विश्वासाचा, नव्या चेतनेचा क्षण आहे. भारताच्या उगवत्या सूर्याला हाक मारण्याचा हा क्षण आहे असं मोदी यांनी आपल्या भाषणात म्हटंलय.

नेहरुंच्या दूरदृष्टीचं श्रेय
तर चांद्रयान मोहिम यशस्वी झाल्यानंतर काँग्रेसने एक ट्विट केलं. भारताचा चंद्र आणि त्यापलीकडेचा प्रवास हा अभिमान, दृढनिश्चय आणि दूरदृष्टीची कहाणी असल्याचं काँग्रेसने आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय. देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचा वैज्ञानिक दृष्टिकोण आणि दूरदृष्टीने भारतीय अवकाश संशोधनाचा पाया रचला.  चांद्रयान-3 चे यश हे नेहरु यांच्या त्याकाळच्या प्रयत्नांचे फळ आहे असं काँग्रेसने म्हटलंय. 

1962 पासून भारताचा अंतराळ प्रवास
भारताच्या अंतराळ प्रवासाची सुरुवात 1962 साली नॅशनल कमिटी फॉर स्पेस रिसर्च (INCOSPAR) च्या स्थापनेपासून झाली. चांद्रयान मोहिमेची सुरुवात मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील सरकारने केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने ती पुढे नेली असंही काँग्रेसने म्हटलं आहे.  होमी भाभा आणि विक्रम साराभाई यांच्या दूरदृष्टीमुळे आणि नेहरूंच्या उत्स्फूर्त पाठिंब्यामुळे हे शक्य झाल्याचंही काँग्रेसने म्हटलंय.