पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांना मोठा धक्का बसला आहे. अभिनेत्री आणि खासदार मिमी चक्रवर्ती (Mimi Chakraborty) यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे. मिमी चक्रवर्ती यांनी ममता बॅनर्जी यांच्याकडे आपला राजीनामा सोपवला आहे. पण अद्याप हा राजीनामा स्विकारण्यात आलेला नाही. जादवपूर येथील खासदार असणाऱ्या मिमी चक्रवर्ती यांनी स्थानिक नेतृत्वाशी आपण नाराज असल्याचं सांगितलं आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपण या मुद्द्यांमध्ये जातीने लक्ष घालत तोडगा काढू असं आश्वासन दिल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
"मी जादवपूरसाठी अनेक स्वप्नं पाहिली आहेत. पण त्यात मला फार अडथळे येत आहेत. जेव्हा एखादी व्यक्ती चित्रपटसृष्टीतून असते तेव्हा तो किंवा ती काम करत नाही असं सांगत त्यांची प्रतिमा खराब करणं फार सोपं असतं," असं मिमी चक्रवर्ती यांनी सांगितलं आहे.
पुढे त्या म्हणाल्या आहेत की, "मला राजकारणातील छक्के पंजे कळत नाहीत. पण जेव्हा मी लोकांपर्यंत पोहोचते, तेव्हा मला वाटतं की हे कदाचित बऱ्याच लोकांच्या पसंतीस उतरलं नसेल किंवा कदाचित त्यापैकी काही असतील असं वाटतं".
मिमी चक्रवर्ती 2019 मध्ये जादवपूर मतदारसंघातून तृणमूल काँग्रेसच्या तिकीटीवर निवडून आल्या होत्या. त्यांनी भाजपाचे अनुपम हाजरा आणि सीपीएमचे बिकाश रंजन भट्टाचार्य अशा दिग्गजांचा पराभव केला होता. मिमी चक्रवर्ती यांनी अशावेळी राजीनामा दिला आहे जेव्हा बंगालमधील अभिनेत्री खासदार नुसरत जहाँ यांच्यावर तृणमूल नेत्यांवरील लैंगिक छळाच्या आरोपांबद्दल मौन बाळगल्याबद्दल टीका होत आहे.
भाजपाने नुसरत जहाँ यांना लक्ष्य केलं आहे. नुसरत जहाँ यांनी यश दासगुप्तासह व्हॅलेंटाइन डे साजरा केल्याचे फोटो, व्हिडीओ शेअर केले होते. यानंतर भाजपाने त्यांच्यावर निशाणा साधला असून आपल्या प्राथमिकता काय आहे याची माहिती असणं महत्त्वाचं आहे असं भाजपाने म्हटलं आहे.